मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (15:01 IST)

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनला देशात लोकप्रियता मिळवून दिली.भारतीय बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली.भारतीय खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवित असलेले यश नंदू नाटेकर यांनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर उभे आहे. नंदू नाटेकर यांचे निधन ही बॅडमिंटन क्षेत्राची, राज्याच्या क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये  मिळवलेले यश हे औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वकष्टावर  मिळवलेलं यश होतं. असं असलं तरी ते अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होते. अर्जुन पुरस्काराने त्यांचा झालेला गौरव हा भारतीय बॅडमिंटनक्षेत्राचा गौरव होता.भारतीय बॅडमिंटनचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या या महान खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.