एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार
मुंबई : मनसुख हिरेन खून प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. एनआयएकडून (NIA) मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) हे मनसुख हिरेन यांच्या हत्ये मागचे मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर याबद्दलचं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये सचिन वाजे यांच्यासह पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांची देखील नावं समोर आली होती.
देशातील बडे उद्योजक अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यापासून या प्रकरणाची सुरुवात झाली होती. त्यानंतर ही कार ज्यांच्या मालकीची आहे ते मनसुख हिरेन काही दिवसांनी मृत आढळले. यावेळी तपासाची चक्र फिरली आणि सचिन वाजे यांचं नाव समोर आलं. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक ट्विस्ट निर्माण झाले आहेत. एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटलं आहे की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत रचण्यात आला होता. इथेच प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते.
दरम्यान, सचिन वाजेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख दिले होते. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी ठेवली 17 जुलै रोजी आहे. या प्रकरणावरुन आतापर्यंत अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले आहेत. विशेष म्हणजे सचिन वाजे हे शिवसेनेच्या जवळचे असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आता समोर आलेलं नाव अर्थाक एन्काऊन्टर स्पेशलीस्ट प्रदीप शर्मा हे देखील शिवसेनेच्या जवळचे आहेत. त्यांनी मागे शिवसेनेत प्रवेश देखील केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर आरोप होण्याची शक्यता आहे.
कधी काळी एन्काऊन्टर स्पेशलिस्ट म्हणून प्रदीप शर्मा यांचं नाव प्रचंड चर्चेत होतं. अंडरवर्ल्ड त्यांच्या नावाने कापायचं अशा चर्चा मुंबईत सुरु होत्या. मात्र नंतरच्या काळात अंडरवर्ल्डशीच त्यांचे संबंध असल्याचे धक्कायदाय आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.