शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 12 जून 2020 (08:08 IST)

मुंबईत उद्या अति मुसळधार पावसाची शक्यता

पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी  6.5 सेंटीमीटर ते 11.5 सेंटीमीटर इतका पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईतही 13 जून रोजीअति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसात कोकण व मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा होती. मात्र मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याने ही प्रतिक्षा आता संपली आहे. पुढील पाच दिवसांत 15 जूनपर्यंत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान,  पुढील 48 तासांत कोकण किनारपट्टीसह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनसाठी योग्य असे वातावरण निर्माण झाले असून  मान्सूनने महाराष्ट्राची सीमा ओलांडली आहे. सोलापूरमधून मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून तळकोकणात मान्सूनने दमदार हजेरीही लावली आहे. पुढच्या काही तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, कुलाबा वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्याची `गुड न्यूज’ दिली आहे.