मास्टरशेफ संजीव कंपूर पूरग्रस्तांना दररोज एकूण १५,००० थाळी ताजे जेवण पुरवणार
मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून ही टीम पूरग्रस्तांना दररोज एकूण १५,००० थाळी ताजे जेवण पुरवणार आहे.
पद्मश्री संजीव कपूर म्हणाले की, 'महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांनी घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही.माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊल अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल,अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबियांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
कोरोनाने संपूर्ण देशाला विळखा घातला असताना, मास्टरशेफ संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने कोरोना विषाणूविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. आतापर्यंत शेफ कपूर आणि वर्ल्ड सेंट्रल किचनचे शेफ जोस अँड्रेस यांनी दिल्ली,गुरुग्राम, अहमदाबाद,मुंबई, बंगळुरू,हैदराबाद,चेन्नई,कोलकाता,गोवा,लखनौ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी १० लाखाहून अधिक थाळी जेवण पुरवले आहे.