बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (16:44 IST)

महापौर किशोरी पेडणेकरांकडून आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल, तर शेलारांचे पोलिस आयुक्तांना पत्र

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. पेडणेकर यांनी बुधवारी रात्री शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे वरळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणावरुन सुरु झालेला हा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, शेलार यांनीही पेडणेकरांनी केलेली तक्रार पडताळून पाहण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे. ‘मी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून वस्तुस्थितीमध्ये फेरफार केल्याचा निषेध व्यक्त करत आणि सत्ताधारी पक्षाच्या घटकांकडून माझ्यावर खोटा खटला भरण्याच्या दबावाला विरोध केला आहे, असं ट्विट करत शेलार यांनी पत्राबाबत माहिती दिलीय.
 
मुंबईतल्या सिलिंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नायर रुग्णालयात रुग्णांन तात्काळ उपचार न करता ताटकळत ठेवल्याचा आरोप केला. यावेळी महापौरांवर टीका करताना. महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? ७२ तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, ७२ तास कुठे निजला होता? अशा शब्दात टीका केली होती. शेलारांच्या ‘कुठे निजला होता?’ याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार करत असल्याचंही म्हटलं आहे.