शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (08:56 IST)

मुंबईत पावसाने मोडला 46 वर्षांचा विक्रम, पंतप्रधानांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

मुंबई आणि जवळपासच्या परिसरात सुरू झालेला संततधार पाऊस सुरुच आहे. अजूनही पुढचे काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन पोलिस आणि प्रशासनाने केले आहे.
 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. केंद्राकडून शक्य असेल ती सर्व मदत दिली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं.
 
पावसाच्या जोराने मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळली तसेच सोसाटयाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर झोपड्यांवरील प्लास्टिक आणि पत्रे उडाले
 
पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचं चित्र दिसून येत आहे. पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. 
 
दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या 46 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं. कोलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल 46 वर्षांनंतर 12 तासांमध्ये 294 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.