रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (21:17 IST)

मुंबई महापालिकेने उद्यानांचा कालावधी वाढवला, पहाटे ५ ते रात्री १० पर्यत उद्याने उघडी

mumbai mahapalika
मुंबई महापालिका उद्यान विभागाने उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क आदी ठिकाणी नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवार ते शुक्रवार या कालावधीत पहाटे ५ ते रात्री १० ( दुपारी १ ते ३ बंद) या  कालावधित सलग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यापूर्वी, सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या कालावधीतच पालिकेची उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क खुली ठेवण्यात येत होती. मात्र आता सकाळच्या सत्रात, दुपारच्या सत्रात आणि रात्रीच्या सत्रात असे प्रत्येकी १ तास वेळ वाढवून दिल्याने दिवसभरात तब्बल ३ तास अधिकचा वेळ उद्याने, मैदाने वापरणाऱ्या नागरिकांना उपलब्ध होणार आहे. 
 
खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच सदर उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने यांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीत-जास्त वापर करता यावा, यासाठी उद्याने व मैदानांच्या वेळेत महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महापालिकेची उद्याने व मैदाने ही सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वापरासाठी खुली असतात. तथापि, उद्याने व मैदानांमध्ये येणाऱ्या अबालवृद्धांची संख्या लक्षात घेता, विशेषतः कोविड संसर्ग कालावधीनंतर सुदृढ आरोग्यासाठी जागरूक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता दिवसातील जास्तीत-जास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती उपआयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
 
मुंबई शहर व उपनगरे आदी भागात महापालिकेची सध्या २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. या सर्व ठिकाणच्या वेळा वाढवल्याने सर्व मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor