शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (14:22 IST)

घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून

murder
मुंब्रा- दिव्यातील नागवाडी परिसरात राहत असलेल्या दशरथ काकडे याने त्याच्या घराजवळ थुंकणाऱ्या रुपेश गोळे या १३ वर्षांच्या मुलाचा राग आल्याने त्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी आरोपी दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले. तेथे गळा दाबून त्याचा खून केला. मयत मुलाचे वडील विजय यांनी याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून काकडे याला पोलिसांनी अटक केली. 
 
दिवा पश्चिम येथील नागवाडी भागात रुपेश हा वडील विजय आणि आईसोबत राहत होता. त्याच्या शेजारी दशरथ हा राहतो. तो रुपेशचा नातेवाईकही आहे. गावदेवीच्या जत्रेला रुपेशला नेतो असे खोटे सांगून दशरथ हा रुपेशला रविवारी दुपारी ३.३० वाजता घेऊन गेला. सायंकाळी दशरथ घरी परतला तेव्हा रुपेश सोबत नव्हता त्यामुळे विजय यांनी दशरथला रुपेशबद्दल विचारले. त्याने तो जत्रेत खेळत असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रुपेश घरी न आल्याने विजय यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दशरथला ताब्यात घेतले. त्याने आधी पोलिसांना फिरवण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर प्रकरण उघडकीस आले. दिवा येथील एका निर्जनस्थळी ठाणे महापालिकेचे एक सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले. आणि त्याठिकाणी त्याचा गळा आवळून खून केला.