आईला डोळा लागला आणि दहा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून झाला मृत्यू
पनवेलमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील घरात पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दहा महिन्यांच्या बाळाचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी आईला झोप लागली तेव्हा बाळ खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडून त्याचा मृत्यू झाला. आईला जाग आली तेव्हा 10 महिन्यांचा मुलगा प्लास्टिकच्या बादलीत उलटा पडलेला दिसला.
आशिक अल इमान असे या 10 महिन्यांच्या बाळाचे नाव आहे. आशिक अल इमानचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे आहेत. दुपारच्या सुमारास त्याची आई घरात झोपली असताना तो आईसोबत घरात होता. तो घरात खेळत होता. खेळता खेळता तो बाथरूममध्ये गेला आणि पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. काही वेळाने आई झोपून उठल्यानंतर तिला आशिक दिसला नाही. शोधा शोध केल्यानंतर तो बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला.
त्यानंतर तिने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या पतीला माहिती दिली. नवरा लगेच घरी आला आणि बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले.