गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मार्च 2023 (21:52 IST)

सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी उद्यान व प्राणिसंग्रहालय खुले

mumbai mahapalika
बृहन्मुंबई  महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुले ठेवण्यात येईल. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच दि. 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या सुट्टीच्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले ठेवण्यात येणार आहे. तर या आठवड्यातील साप्ताहिक सुट्टी ही येत्या गुरुवारी म्हणजेच दिनांक 23 मार्च 2023 रोजी असणार आहे. जेणेकरुन पाडव्याच्या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल व एकूणच तेथील पर्यावरणाचा आनंद घेता येईल.
 
दरम्यान, बुधवारी राणीची बाग जनतेकरिता खुले ठेवण्यात येणार असल्याने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी हे प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे. यानुसार राणीची बाग प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक 23 मार्च, 2023 रोजी जनतेकरिता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. हे उद्यान साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. इतर दिवशी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरु असते. तर उद्यान सायंकाळी 6.00 वाजता बंद होते.
 
या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती 50 रुपये इतके शुल्क असून वय वर्ष 3 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी 25 रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. विशेष म्हणजे आई – वडिल आणि 15 वर्षे वयापर्यंतची 2 मुले अशा 4 व्यक्तिंच्या कुटुंबासाठी 100 रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor