शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार केली आहे. मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाणे येथे या महिलेने लेखी तक्रार नोंदवली आहे. दरम्यान शेवाळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलेने राहुल शेवाळे यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. पण या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस या प्रकरणात आणखी चौकशी करत आहेत, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एका महिलेकरवी माझ्या विरोधात करण्यात आलेली लेखी तक्रार ही संपूर्णतः निराधार असून सामाजिक – राजकीय क्षेत्रातील माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर करण्यात आली आहे. माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णतः विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. या निवेदनाद्वारे मी स्पष्ट करू इच्छितो की माझे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असून या बोगस तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पर्दाफाश लवकरच करेन अस स्पष्टीकरण राहुल शेवाळे यांनी दिल आहे.