रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्ती
करोनाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचं करण्याच्या सूचना मुंबई शहराचे पालकमंत्री आणि मंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना केल्या आहेत. यापूर्वी करोनावरील उपचारातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने (सीडीएससीओ) राज्यांच्या औषध प्रशासनाला परिपत्रकाद्वारे दिले होते.
रेमडेसिवीर औषधाचा फार मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या बातम्या गेले काही दिवस प्रसारीत होत होत्या. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अस्लम शेख म्हणाले की, “यापुढे रेमडिसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.” “ज्या रुग्णांना रेमडेसिवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणंही रुग्णालयांना बंधनकारक असेल. तसं न झाल्यास त्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल होई,” असंही शेख म्हणाले