गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (15:16 IST)

रिक्षाला बीएमडब्ल्यूची नंबर प्लेट; चालकाला पकडले

Rickshaw with BMW number plate; Caught the driverरिक्षाला बीएमडब्ल्यूची नंबर प्लेट; चालकाला पकडले Maharashtra Mumbai News  In Webdunia Marathi
ठाणे : काळ्या-पिवळ्या रिक्षाला चक्क महागड्या बीएमडब्ल्यू कारची नंबर प्लेट लावून फिरणार्‍या रिक्षाचालकाला कोनगाव पोलिसांनी पाठलाग करून फिल्मी स्टाइलने बेड्या ठोकल्या आहेत. जितेंद्र पटेल असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून त्याने ही नंबर प्लेट कुठून आणली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांना नाशिक -मुंबई हायवे रोड, सिप्ला वेअर हाऊसच्या पिंपळास गाव परिसरात जितेंद्र पटेल रिक्षा क्रमांक (एमएच 04 जीएन 7100) वर बनावट नंबर प्लेट लावून फिरत असल्याची माहिती मिळाली होती.त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पराग भाट, जे. आर. शेरखाने यांच्या टीमने पटेल याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला. मात्र या पोलिसांच्या पथकाला पाहून पटेल याने धूम ठोकली. त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. या रिक्षावरील क्रमांक भाईंदर पाडा येथे राहणार्‍या सोनू शर्मा यांच्या मालकीच्या बीएमडब्ल्यूचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.