शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (08:13 IST)

नवीन पत्रीपुलाचे काम, 17 सप्टेंबरपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत वाहतूक बंद

कल्याण डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या नवीन पत्रीपुलाचे गर्डर बसवण्यासाठी सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. नविन पत्रीपुलाचे दुसऱ्या टप्प्यातील गर्डर बसवण्यासाठी पुढील 3 दिवस जुन्या पत्रीपुलावरील वाहतूक रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे.
 
या पुलाचे काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या महिन्यात पहिल्या टप्प्यातील गर्डर बसवण्यासाठी 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यानही अशाच प्रकारे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. नविन पुलाचे गर्डर ठेवण्यासाठी एक भलीमोठी क्रेन मागवण्यात येणार आहे. ही क्रेन सध्याच्या वापरात असणाऱ्या जुन्या पुलावर उभी करून गर्डर ठेवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामूळे या मार्गावरील वाहतूक रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर असे 3 दिवस हे काम चालणार असून त्यासाठी हा रस्ता बंद करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. 
 
कल्याण शिळ रोडवरून जाणाऱ्या जड आणि अवजड वाहनांना रांजणोली नाक्यावरून प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने रांजणोली नाका भिवंडी येथून खारेगाव टोलनाका मुंब्रा बायपास मार्गे जातील.
 
शिळरोड वरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना कल्याणच्या दुर्गामाता (दुर्गाडी) चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने आधारवाडी चौक-खडकपाडा चौक-वालधुनी पुलावरून कल्याण पूर्वेतून इच्छित स्थळी जातील.
 
कल्याण नगर मार्गावरील वाहनांना सुभाष चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने नेताजी चौकातून वालधुनी पुलावरून इच्छित स्थळी मार्गस्थ होतील.
 
कल्याण शिळफाटा रोडवरून पत्रीपुलाकडे जाणाऱ्या वाहनांना सूचक नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथून उजवीकडे वळण घेऊन मार्गस्थ होतील. तर कल्याण पश्चिमेकडे जाणारी वाहने कल्याण फाट्यावरून खारेगाव टोल नाका येथून रवाना होतील.