मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By विकास शिरपूरकर|
Last Modified: जयपूर , गुरूवार, 18 फेब्रुवारी 2010 (11:31 IST)

जयपूर वन-डेवर हल्‍ल्‍याचे सावट

जयपूर येथे होणा-या भारत दक्षिण आफ्रीका एकदिवसीय सामन्‍या दरम्‍यान दहशतवादी हल्‍ला होऊ शकतो अशी शक्यता गुप्‍तचर विभागाने दिली असून सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. येथील सवाई मानसिंग स्‍टेडियमवर येत्‍या 21 फेब्रुवारी रोजी हा सामना खेळला जाणार असून हल्‍ल्‍याच्‍या शक्यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

या संदर्भात गुप्‍तचर विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार जयपूर येथे येत्या 21 फेब्रुवारी रोजी भारत द.आफ्रीके दरम्यान होणा-या पहिल्‍या एक दिवसीय सामन्‍यात घातपात घडवून आणण्‍याचा प्‍लान दहशतवादी संघटनांनी केला आहे. त्‍यांच्‍या या योजनेत भारतातील एका तरुणाचा सहभाग असून त्या दृष्‍टीने दहशतवाद्यांनी तयारी पूर्ण केली आहे.

गुप्‍तचर विभागाच्‍या या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्‍या असून शहरातील सीमीसह इंडियन मुजाहिद्दीनच्‍या संशयितांचे अटक सत्र सुरू करण्‍यात आले आहे. महाराजा सवाई मानसिंह स्‍टेडीयममध्‍ये कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था उभी करण्‍यात आली असून शहरातील प्रमुख ठिकाणांवर चोख पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.