शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2016 (11:11 IST)

नाहीतर भाजपचे सर्जिकल स्ट्राईक -- उद्धव ठाकरे

महारथींचा अश्वमेध शिवसैनिकांनी महाराष्ट्रात रोखला. अजूनही फरफरी बाकी असेल तर युती तोडा आणि अंगावर या. तुम्ही पाठीवर वार न करता, समोरुन वार करा मग आम्ही आमचा सर्जिकल स्ट्राईक दाखवून देऊ असा थेट इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला  आहे. शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सर्जिकल स्ट्राईक, मराठा आरक्षण, कार्टून वाद आणि आगामी महापालिकेच्या निवडणुका या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली.
 
भारताने उरी हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केलं. भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी उद्धव ठाकरेंनी जाहीर अभिनंदन केलं. यावेळी रेसकोर्सवर ‘वॉर म्युझियम’ बनवण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
 
या सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेत त्याचं राजकराण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.  सर्जिकल स्ट्राईकवर कारवाईवर संशय घेणाऱ्यांचे मेंदू सडलेले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.शहीद जवानांच्या रक्ताची दलाली केली असा आरोप मोदींवर करताना हा शब्द कुठुन शिकला ?, बोफोर्स घोटाळ्यामधून शिकलात का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना विचारला. ते पुढे म्हणाले, मोदींवर जे आरोप करायचे ते करा पण शहीद जवानांना घेऊन असं घाणरेडं राजकारण करू नका असेही त्यांनी ठणकावून  सांगितले  आहे. राज्यात अनेक भागात ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलंय. त्यामुळे ऍट्रॉसिटी कायद्याचा जे कुणी गैरवापर करत आहे त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी असे मत त्यांनी मांडले आहे.