पंचगंगा पात्राबाहेर
कोल्हापूर : पावसाच्या संततधारेने नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाचा आज जोर आहे.
पावसाने पंचगंगेच्या पातळीत वेगाने वाढ होत गेली. रविवारी पहाटे पंचगंगा पात्राबाहेर पडली. रात्री आठ वाजता पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यासमोरील गंगावेश-शिवाजी पूल रस्त्याला लागले. पंचगंगेची पातळी वाढत असून पावसाचा जोर असाच राहिला, तर दोन दिवसांत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील 43 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यावरील वाहतूक बंद असून अनेक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. पन्हाळा तालुक्यातील तांदूळवाडी व गोटमवाडी या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. गगनबावडा तालुक्यातील टेकवाडीलाही पुराचा वेढा पडला आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.