शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By नितिन फलटणकर|

साई समाधीचा कॉपीराइट संस्थानकडेच

- नितिन फलटणकर

WD
WD
साई बाबांच्या समाधी आणि पादुकांचे प्रतिरुप कुठेही उभे करण्यास साई संस्थानने आक्षेप नोंदवला असून, शिरडीतील समाधी व पादुकांची नक्कल केल्यास कायदेशीर कारवाईचा विचार संस्थान करत आहे. याचा अर्थ आता संस्थानने साईंच्या पादुका आणि समाधीचा कॉपीराइट पुर्णपणे आपल्याकडे ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

साईंचे समाधीस्थळ आणि पादुका फक्त शिरडीतच आहेत. जगभरातील अनेक देशात आणि शहरात साईंची मंदिरे आहेत. या मंदिरात साई बाबांच्या मूर्ती पुढ्यात अनेक संस्थांनी समाधी उभी करत, त्यांच्या पादुका यावर ठेवल्याचे भासवल्याने येणाऱ्या पिढ्यांची दिशाभूल होत असल्याचे संस्थानचे विश्वस्त अशोक खांबेकर यांचे म्हणणे आहे.

साई बाबा 1858 मध्ये शिरडीत दाखल झाले होते, यानंतर त्यांनी 1918 मध्ये समाधी घेतली होती. त्यांच्या समाधीनंतर त्यांनी कोणालाही आपला उत्तराधिकारी नियुक्त केले नव्हते. आज अनेक जण साई बाबांच्या पादुकांची नक्कल करत त्यांचे उत्तराधिकारी असल्याचे भासवत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचे खांबेकर यांचे म्हणणे आहे.

साई बाबांच्या पादुका या शिरडीतील संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या असून, त्यांची यथावत पुजाही केली जाते. पादुकांचा लाभ देश-विदेशातील भक्तांना व्हावा यासाठी काही दिवसांपूर्वी या पादुका जगभर दर्शनासाठी नेण्यात आल्या होत्या.

यानंतर अनेक संस्थांनी या पादुकांची प्रतिकृती तयार करत आणि बाबांच्या समाधीची नक्कल केली असून, अशा मंदिर आणि संस्थांनी त्वरित पादुका आणि समाधीची प्रतिकृती काढून टाकावी अन्यथा त्यांना साई संस्थानच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा खांबेकर यांनी दिला आहे.