गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (07:51 IST)

मुंबई-गोवा महामार्गावर साडेबारा वर्षांत अपघातांमध्ये १ हजार १४३ जणांचा मृत्यू

goa mumbai highway
Mumbai Goa highway रखडलेले चौपदरीकरण..., धोकादायक वळणे..., ठिकठिकाणी पडलेले खड्डे..., महामार्गाच्या‌‌ क्षमतेपेक्षा सुरू असलेली जास्त वाहतूक ..., भरधाव वाहने..., यामुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावरील अपघातांना १२ वर्षांपासून रखडलेले चौपदरीकरणाचे काम व महामार्गावरील खड्डे सर्वात जास्त कारणीभूत असून, सरकार स्तरावरील अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यात रायगड जिल्हा पोलिस दुरक्षेत्र हद्दीत येणाऱ्या महामार्गावरील भागात ११२ अपघात झाले असून, त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १७० जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या महामार्गावर १ जानेवारी २०११ पडून ते ३१ जुलै २०२३ या १२ वर्ष ७ महिन्यांच्या कालावधीत ४ हजार ८३३ अपघात झाले असून, त्यामध्ये १ हजार १४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या १५४ किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. महामार्गावरुन दररोज १ लाख ८५ हजार ९४२ मेट्रिक टन एवढी वाहतुक होते. तसेच पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे चौपदरीकरणाचे काम १२ वर्षांपासून रखडले आहे. तसेच इंदापूर पुढील दुसऱ्या टप्प्याच्या कामाचीही तीच गत आहे. महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच पर्यायी मार्ग, पुलांची कामे, संरक्षक फलकांचा अभाव या सर्व बाबींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते.
वर्ष - एकूण अपघात - मृत्यू - जखमी
२०११ : ६११ : १३६ : ६१९
२०१२ : ६४९ : १२४ : ८५८
२०१३ : ४७४ : १२२ : ४६७
२०१४ : ४६२ : ९३ : ४३९
२०१५ : ४९७ : ९९ : ६२४
२०१६ : ४६० : ११० : ८८७
२०१७ : ३६२ : ७३ : ३९५
२०१८ : ३६२ : ९७ : ४१८
२०१९ : ३१५ : ६७ : ४२९
२०२० : २०३ : ६८ : २३५
२०२१ : १५४ : ४७ : १४९
२०२२ : १७२ : ५८ : १८६
२०२३ (३१ जुलैपर्यंत) : ११२ : ४९ : १७०
एकूण : ४ हजार ८३३ : १ हजार १४३ : ५ हजार ८७६
महामार्गासाठी आंदोलने
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी अनेकदा सामाजिक राजकीय संघटनांनी आंदोलने केली. मात्र याकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील हा एकमेव महामार्ग रखडलेल्या अवस्थेत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गावरून जाताना रस्त्याची दुरवस्था आणि खड्डे यामुळे अपघात होतात. शिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते.
रस्त्याचे काम का रखडले?
सुरवातीला भूसंपादनातील अडचणीमुळे हे काम रखडले. सुरवातीला पेण आणि माणगावमध्ये शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध होता. त्यानंतर भूसंपादनाचा मोबदला मिळण्यास उशीर झाल्याने माणगाव पट्ट्यातील कामे रखडली. महामार्ग कर्नाळा अभयारण्यातून जात असल्याने पर्यावरणविषयक परवानगीस उशीर झाल्याने कामे लांबली. नंतर ठेकेदाराची दिवाळखोरी रस्त्याच्या कामात आडवी आली. ही बाब लक्षात घेऊन पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील कंत्राटदाराची हकालपट्टी करून नवीन कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली. पण पूर्वीचा ठेकेदार न्यायालयात गेल्याने या कामाला पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला होता. त्यातच पळस्पे ते इंदापूर दरम्यान पहिल्या टप्प्याच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्याचे तीन वेळा भूमिपूजन
मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यान कामाचे अतातोर्यंत तीन वेळा भूमिपूजन करण्यात आले आहे.