बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (15:57 IST)

भारतीय कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू, उझबेकिस्तानचा दावा

भारतात बनवलेल्या कफ सिरपच्या कथित सेवनामुळे 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानने केला आहे. उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की मृत्यू झालेल्या 18 मुलांनी Doc-1 Max कफ सिरपचे सेवन केले होते. हे औषध नोएडास्थित मेरियन बायोटेकने बनवले आहे. या दाव्यानंतर भारताने चौकशी सुरू केली आहे.
 
तसेच मंत्रालयाने सांगितले की सिरपच्या एका बॅचच्या प्रयोगशाळेत चाचणीमध्ये इथिलीन ग्लायकोल आढळून आले, जो विषारी पदार्थ आहे.
 
डॉक्टरांचा सल्ला न घेता मुलांना हे सिरप घरीच देण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. हे सिरप मुलांना पालकांनी किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने दिले. यासोबतच त्याचा प्रमाणापेक्षा जास्त डोस मुलांसाठी देण्यात आला आहे.
 
मंत्रालयाने असेही सांगितले की, असे आढळून आले आहे की, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी 2-7 दिवस मुलांना हे सिरप देण्यात आले आहे. सिरपचा डोस दिवसातून तीन ते चार वेळा 2.5 ते 5 मिली इतका दिला गेला आहे, जो प्रमाणित डोसपेक्षा जास्त आहे.
 
निवेदनात म्हटले आहे की, 18 बालकांच्या मृत्यूनंतर देशातील सर्व फार्मसीमधून डॉक-1 मॅक्स गोळ्या आणि सिरप काढून टाकण्यात आले आहेत. यासोबतच सात कर्मचाऱ्यांना वेळेत परिस्थिती हाताळता न आल्याने आणि आवश्यक ती पावले उचलण्यात अपयश आल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
 
नोएडा येथील एका औषध निर्मात्याने उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू सिरपशी जोडल्याचा दावा केल्यानंतर भारताने चौकशी सुरू केली आहे.
 
अधिकार्‍यांनी सांगितले की, केंद्रीय औषध नियामक पथकाने उत्तर प्रदेश औषध परवाना प्राधिकरणाशी संपर्क साधला आहे, जेणेकरून फार्मास्युटिकल कंपनीविरुद्ध चौकशी सुरू करता येईल. केंद्र आणि राज्याचे औषध नियामक पथक संयुक्त चौकशी करणार असल्याची माहितीही मिळाली आहे.
 
फार्मा कंपनीने सांगितले की, उत्पादन युनिटमधून कफ सिरपचे नमुने घेण्यात आले आहेत आणि आम्ही चाचणी अहवालांची वाट पाहत आहोत. चाचणीचा अहवाल येईपर्यंत उत्पादन आणि निर्यात थांबवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
 
मुलांच्या मृत्यूच्या दाव्याबाबत उझबेकिस्तानकडूनही अहवाल मागवण्यात आला आहे.
 
गेल्या वर्षभरात ही दुसरी वेळ आहे की भारतीय कफ सिरपची तपासणी झाली आहे. यापूर्वी हरियाणाच्या मेडेन फार्मास्युटिकल्सने तयार केलेल्या कफ सिरपमुळे गांबियातील 70 मुलांचा मृत्यू झाला होता.
 
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने उत्पादन मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल ऑक्टोबर महिन्यात सोनीपतमधील त्यांचे युनिट बंद केले होते.