बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पैशांसाठी तब्बल 2200 महिलांची गर्भाशये काढली

बेंगळुरु- ग्रामीण भागातील महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पैशाच्या हव्यासापायी 2200 महिलांची गर्भाशये काढून घेणारी कर्नाटकातील चार रूग्णालये विनापरवाना सुरू असल्याचे उघड झाले आहे. गंभीर गुन्हे करुनही राजरोस सुरू असलेल्या या रूग्णालयाविरोधात हजारो पीडित महिला रस्त्यावर उतरल्या. या रूग्णालयातील डॉक्टर व व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करूनही रूग्णालये कायमची बंद करावीत, अशी मागणी या ‍महिलांनी केली आहे.
 
गरज नसताना ग्रामीण भागातील महिलांच्या गर्भपिशव्या काढून टाकणारे एक रॅकेट 2015 मध्ये उघडकीस आले होते. पोटदुखी व सांधे दुखीसाठी डॉक्टरांकडे येणार्‍या महिलांना गर्भशयाचा गंभीर आजार किंवा कर्करोग झाल्याची भीती दाखवून त्यांचे गर्भाशय काढण्याचा सल्ला देण्यात येत होता. लंबानी व दलित समजातील 2200 महिलांची गर्भाशये काढून टाकण्यात आल्याचे चौकशीत पुढे आले होते.
 
आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालानुसार, अनेक महिला ओटीपोटातील दुखणे आणि पाठदुखीसाठी डॉक्टरांच्या संपर्कात होत्या. प्रथम त्यांना अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करण्यासाठी सांगितले जाई व तात्पुरते औषध देण्यात येई. काही काळानंतर महिलेला काही फरक नाही पडला तर गर्भाशयाच्या कर्करोगाची भीती दाखवून तिची गर्भपिशवी काढून टाकरण्याचा सल्ला दिला जाई. अशा अनेक घटना समोर आल्यानंतर हे रॅकेट समोर आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने या रूग्णालयांचे परवाने रद्द केले होते.
 
मात्र, पुढे काहीस ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ही रूग्णालये आजही सुरू असून आरोपी डॉक्टर उजळ माथ्याने व्यवसाय करत आहेत. या विरोधात कालबुरागी येथे अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांसह पीडित महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पोलिस उपायुक्तांच्या कार्यलयासमोर निदर्शने केली.