शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (08:56 IST)

उत्तर काशीमध्ये बस दरीत कोसळून 25 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बस दरीत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
 
रविवारी (05 जून) संध्याकाळी उशीरा एक बस एनएच-94 वर डामटापासून दोन किमी पुढे जानकीचट्टीजवळ खोल दरीत कोसळली. बसमधील लोक मध्य प्रदेशातील यात्रेकरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
"मध्य प्रदेशातील पन्ना येथील यात्रेकरूंच्या बसला अपघात झाल्याची अत्यंत दुःखद घटना आज घडली; तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व मदत प्रयत्न करत आहोत. डीएम आणि एसपी दोघेही घटनास्थळी पोहोचले असून, एचएमने एनडीआरएफ टीम पाठवली आहे," अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
 
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील 28 यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस उत्तरकाशी जिल्ह्यातील डामटाजवळ दरीत कोसळली असून 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले , तर 6 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले . तसेच घटनास्थळी पोलिस आणि SDRF पोहचले असल्याची माहिती DGP अशोक कुमार यांनी दिली.
 
दरम्यान उत्तराखंडमधील या भीषण बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे.

दरम्यान मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान रात्री 12 वाजता डेहराडूनला पोहचले आहेत. त्यांनी सांगितले की उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री धामी  या घटनेपासून सतत संपर्कात आहेत.  सर्व भावा-बहिणींचे पार्थिव रात्रीच खंदकातून बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदन पूर्ण झाले. आता सर्व पार्थिव देहरादूनला आणले जात आहेत.