गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (21:01 IST)

ग्रहण दिसणार का ? कधी आणि कसे दिसणार ?

येत्या रविवारी  २१ जून ला होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे महाभारत युद्ध झाले त्या कुरूक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. 
 
सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी तेथे सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून २ मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. कुरुक्षेत्र हे महान तीर्थक्षेत्र असल्याने तेथील ब्रह्मासरोवरावरावर तीर्थस्नानासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा राज्य सरकारला तेथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल.
 
मुंबईतून रविवारी सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीतजास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.  पुणे येथून सकाळी १०-०३ ते दुपारी १-३१, नाशिक येथून सकाळी १०-०४ ते दुपारी १-३३, नागपूर येथून सकाळी १०-१८ ते दुपारी १-५१ , औरंगाबाद येथून सकाळी १०-०७ ते दुपारी १-३७ यावेळेत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. 
 
सुर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी ग्रहणचष्म्याचाच वापर करावा. फोटो काढताना किंवा दूर्बिणीतून सूर्यग्रहण पाहतांना योग्य फिल्टरचा वापर करावा.