राजीनामा शिंदेंचा, पण ट्रेन्डिंगवर मात्र सचिन पायलट
काँग्रेसमध्ये असलेला 'जनरेशन गॅप' आता खुल्लम खुल्ला बाहेर आलाय. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याने मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे. इतकेच नाही तर मध्य प्रदेशात आपले सरकार वाचवणेही काँग्रेसला कठीण जाणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची चर्चा होणारच हे तर साहजिकच आहे. पण ट्विटरवर ट्रेन्डिंगवर मात्र काँग्रेसचे आणखीन एक तरुण नेते आणि राजस्थानचे
उपमुख्यमंत्री सचिन पायलट आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर आता सचिन पायलटही काँग्रेसला रामराम ठोकणार का? अशा शक्यता आणि चर्चा सोशल मीडियावर रंगल्यात. दुसरीकडे, सचिन पायलट यांनी मात्र मध्य प्रदेशचा राजकीय पेच लवकरच सुटेल, अशी आशा व्य्रत केली आहे. मला आशा आहे की, मध्यप्रदेशवर घोंघावणारे राजकीय संकट लवकरच संपुष्टात येईल. सर्व नेते मतभेदांना दूर सारण्यात यशस्वी होतील. निवडणुकीत दिलेल्या वचनांना पूर्ण करण्यासाठी राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदेयांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झालेत. तर काही यूजर्स शिंदे यांच्यानंतर आता सचिन पायलट म्हणत काँग्रेसवर निशाणा साधत आहेत.