बिनधास्त फोटो काढा, पुरातत्व विभागाने दिली परवानगी
भारतीय पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार देशातील ३ वारसास्थळांना वगळून इतर सर्व स्मृतीस्थळे आणि वारसास्थळांमध्ये फोटोग्राफी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता पर्यटकांना बिनधास्त फोटो काढता येणार आहेत. पण यामधून अजिंठा लेण्यांमधील गुहा, लेह पॅलेस आणि ताजमहाल यांना वगळण्यात आले आहे. याठिकाणी फोटो काढण्यासाठी असलेली बंदी कायम असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. याबाबतचे पत्र पुरातत्व विभागाकडून देशातील सर्व कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीय पुरातत्व विभागाच्या मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभांत पर्यटकांना वारसास्थळ आणि स्मारकांचे फोटो काढण्यास मनाई असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की एखाद्या शहरातील गल्लीत कोणती गाडी पार्क केली आहे? त्या गाडीचा नंबर काय आहे याची माहिती अंतराळातून फोटो काढून मिळवली जाते. पण आपल्या देशातील स्मारक आणि ऐतिहासिक वास्तूंचे फोटो काढण्यास मनाई असल्याचे बोर्ड वाचावे लागतात. आता वेळ आणि तंत्रज्ञान दोन्ही बदलले असल्याचे त्यांनी सांगितले. या भाषणानंतर पुरातत्व खात्याकडून त्याबाबत आदेश काढण्यात आला.