सोमवार, 2 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (17:08 IST)

'आर्यन खान बेकायदेशीरपणे कोठडीत,' शिवसेनाच्या किशोर तिवारींची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शिवसेनेनं आर्यन खानच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेनं एनसीबीच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.
शिवसेना नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एनसीबीकडून काही ठराविक सेलिब्रिटींना टार्गेट केलं जात असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. ई-मेलद्वारे याचिका दाखल केल्याची किशोर तिवारी यांनी माहिती दिली आहे.
राज्यघटनेच्या कलम 32 नुसार शिवसेना नेते तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आर्यन खानला 17 रात्री बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवण्यात आलं आहे. हा स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्काचं उल्लंघन आहे, असंही तिवारी यांनी म्हटलं.
 
न्यायालयानं स्वाधिकारात या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती किशोर तिवारी यांनी याचिकेतून केली आहे.
दरम्यान, क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचे इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानचे समुपदेशन कधी केले ते सांगावे आणि त्याचं व्हीडिओ रेकॉर्डिंग समोर आणावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी (18 ऑक्टोबर) केली होती.
आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या वकिलांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाचा निर्णय 20 ऑक्टोबर रोजी येणार आहे.
आर्यन खानसोबत मुनमुन धमेचा, अरबाज मर्चेंट, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांना ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री छापा टाकला होता. मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (NCB) त्याची चौकशी सुरू झाली. जे. जे. मेडिकल महाविद्यालयात आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.
 
आर्यन खानसह याप्रकरणात आठ जणांना NCB ने ताब्यात घेतलं. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी त्यांची नावं असल्याचं एनसीबीनं सांगितलं होतं.
NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत आर्यन खानसह इतर 8 आरोपींना अटक करण्यात आली.
3 ऑक्टोबर रोजी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपींकडे 13 ग्राम कोकेन, 5 MD मेथाडोन, 21 ग्राम चरस, 22 एकस्टेसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांची रोख सापडली असा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला.