मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (09:46 IST)

बिहारच्या बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 लोकांचा मृत्यू

death
बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात सोमवारी चेंगराचेंगरी झाली.
 
या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही घटना रात्री 12 ते 12.30 च्या दरम्यान घडली आहे.
 
जहानाबादचे एसडीओ विकास कुमार म्हणाले की, "ही दुःखद घटना आहे. सर्व व्यवस्था करण्यात आली होती. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. आतापर्यंत 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर 10 हून अधिक जखमी आहेत."
 
यापूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंद्राराऊ परिसरातील पुलराई गावात आयोजित एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 120 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
 
जहानाबादच्या जिल्हाधिकारी अलंकृता पांडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे."
 
जहानाबादचे एसएचओ दिवाकर कुमार विश्वकर्मा म्हणाले की, "जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी गेले आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या घटनेत एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही त्यांच्या (मृत आणि जखमी) कुटुंबीयांना भेटत आहोत आणि माहिती घेत आहोत. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवू."
 
जखमींवर जहानाबाद सदर आणि मखदुमपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मखदुमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.