भाजपने राज ठाकरे यांना व्यंगचित्रातूनच दिले प्रत्युत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राला आता भाजपने व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी भाजपने राज ठाकरे यांना बोलघेवडा पोपट म्हटले आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. याच मुलाखतीचा संदर्भ घेत भाजपने राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपने हे व्यंगचित्र स्वत: च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंना ‘बोलघेवडा पोपट’ म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्याच मुलाखतीचा संदर्भ घेत भाजपने आपल्या व्यंगचित्रात ‘क्रोध मोदींच्या यशाचा’ अशा मथळ्याखाली व्यंगचित्र काढलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात मोदींच्या मुलाखतीला ‘एक मनमोकळी मुलाखत’ म्हटले होते. याउलट भाजपने आपल्या व्यंगचित्रात ‘एक सेटींगवाली मुलाखत’ असे म्हटले आहे.