शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (22:27 IST)

अमरनाथमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू, मदतकार्याला सुरुवात

जम्मू काश्मीरमधील अमरनाथ या हिंदू धार्मिक तीर्थक्षेत्र परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. ANI वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली असून घटनेचा व्हीडिओही त्यांनी ट्विट केला आहे.
 
ANI च्या ट्विटनुसार, आज (8 जुलै) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यानंतर घटनास्थळी NDRF, SDRF आणि इतर संस्था मदतकार्यासाठी तातडीने पाठवण्यात आल्या आहेत. अडकलेल्या नागरिकांचं बचावकार्यही सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती पहलगामच्या पोलीस नियंत्रण कक्षाने दिली आहे.
 
अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेत 10 जणांच्या मृत्यूची माहिती मिळाली. तर तिघांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. ढगफुटीदरम्यान, काही तंबू अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात आल्याचं दिसून आलं.
 
ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
 
अमित शाह यांनी ट्विट करून म्हटलं की स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केलं आहे. नागरिकांचा जीव वाचवणं, याला आपलं प्राधान्य असेल.