शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (15:32 IST)

गांजा आणि तंबाखूमधील एनसीबीला फरक कळतो का?; मलिक यांचा सवाल जावयाकडे गांजा सापडलाच नाही !

माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश केला. एनसीबीच्या छाप्यात २०० किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. २७ अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे. एनसीबी फर्जिवाडा करत आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत सुरुवातीपासूनचा घटनाक्रमच सांगितला. ६ तारखेला आम्ही एनसीबीबाबत काही सवाल उपस्थित केले होते. केपी गोसावी, मनिष भानुशालीवर बोललो होतो. त्यावेळी मला माझ्या जावयाविषयी विचारलं होतं. १३ जानेवारीला माझे जावई समीर खानला अटक झाली. तेव्हाही मी मीडियाला सांगितलं होतं की, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कायदा आपलं काम करेल. देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. गेल्या पत्रकार परिषदेतही हेच सांगितलं होतं. मात्र, तरीही भाजप नेते माझ्या जावयाची बदनामी करत होते. मलिक यांचे जावई ड्रग डिलर आहेत. अटक झाल्याने सूडापोटी एनसीबीला बदनाम करत आहेत, असं भाजप नेते सांगत होते, असं त्यांनी सांगितलं.
२७ तारखेला एनडीपीएसच्या स्पेशल कोर्टाने समीर खान आणि दोघांना साडे आठ महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामीन दिला. त्यानंतर आमची पत्रकार परिषद झाली. मात्र, रिटर्न ऑर्डर आम्हाला मिळाली नव्हती. काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या पोर्टलवर जस्टीस जोगळेकरांची ऑर्डर लोड झाली. त्यानंतर आम्ही ती वाचली. त्यात जावयाकडे गांजा सापडला नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. मात्र, दरम्यानच्या काळात जावयाला तुरुंगात राहावं लागलं. माझी मुलगी ट्रॉमात होती. त्यांच्या मुलावर परिणाम झाला. ते समाजात कुणाला भेटू शकत नाही. ती केवळ माझ्या घरी किंवा माझ्या दुसऱ्या मुलीला भेटते. अशी परिस्थिती आहे, असं मलिक म्हणाले.
मात्र काल जो आदेश आला. त्यापूर्वी काही घटनाक्रम मी तुमच्यासमोर ठेवतो. २०० किलो गांजा जप्त केल्याची एनसीबीने ९ तारखेला तुम्हाला माहिती दिली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एक प्रेस रिलीज आणि चार फोटो दिले. ९८२०१११४०९ या नंबरवरून चार फोटो दिले गेले. एका ब्रिटीश नागरिकाला अटक केल्याचं सांगितलं गेलं. या नंबरवरूनच सर्वांना मेसेज दिले गेले. अनेक मीडियात हे फोटो आले. त्यानंतर ९ जानेवारी रोजी एका मुलीकडून साडे सात ग्रॅम गांजा पकडला गेला. त्या मुलीला त्याच दिवशी जामीन दिला गेला. त्यानंतर दिल्लीत रेड मारली. त्यानंतर गुलबर्ग, नोएडा, गुरगाव, बंगळुरू आदी ठिकाणी धाड मारली. त्यानंतर रामपूरमध्येही एक रेड मारली. त्याची माहिती एनसीबीनेच दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
कानपूरमध्ये छापा मारल्याचं एनसीबीने सांगितलं. माझा जावई वांद्र्यात राहतो. ९ तारखेला आमची अ‍ॅनिवर्सरी होती. आम्ही सर्व जेवायला गेलो. १३ तारखेला एका पत्रकाराचा फोन आला. तुमच्या जावयाला एनसीबीने समन्स पाठवला आहे का? त्याला का समन्स पाठवतील? असा प्रतिप्रश्न मी केला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री १० वाजता एनसीबीने जावयाला हा समन्स पाठवला. १३ तारखेला सकाळी १० वाजता एनसीबीने हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार माझा जावई एनसीबीच्या कार्यालयात गेला असता तिथे आधीच चॅनेलवाले उपस्थित होते. संध्याकाळपर्यंत पुन्हा बातमी आली, त्याच नंबरवरून मेसेज व्हायरल झाला. समीर खान हा ड्रग्ज पेडलर आहे. निर्यात करतो. त्याला अटक करण्यात आली असा मेसेज त्या नंबरवरून व्हायरल झाला. आम्ही कोर्टात धाव घेतली. जामीन मागितला. जामिन मिळाला नाही. सहा महिने ज्या दिवशी पूर्ण होत होते त्या दिवशी एनसीबीने कोर्टाला सांगितलं आम्ही ७ तारखेला चार्जशीट दाखल करू. त्यानंतर आम्ही लोअर कोर्टात याचिका दाखल केली. साडे तीन महिने टाळाटाळ होत होती. जेवढा वेळ घालवता येतील तेवढा घालवला. त्यानंतर जामीन झाला, असंही त्यांनी सांगितलं.
नवाब मलिकांना वाय प्लस सुरक्षा
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने केलेली कारवाई बोगस असल्याचं सांगत अनेक मोठे गौप्यस्फोट करणारे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सुरुक्षा आता वाढवण्यात आली आहे. नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहे.
सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. कशासाठी सुरक्षा वाढवली याची माहिती नाही. पण सुरक्षा वाढवली हे खरं आहे. तसंच हे देखील खरं आहे की, जेव्हापासून पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून देशभरातून कार्यालयात फोन येत आहेत, उडवून टाकू, इथे मारु, तिथे मारु…अशा धमक्या येत आहेत. हे कोण लोक आहेत याची लेखी तक्रार आम्ही गृह विभागाच्या सचिवांना देणार आहोत. जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असं नवाब मलिकयांनी सांगितलं.