चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून वाग्दत्त वरांच्या डोप टेस्टसाठी लवकरच सोयी करण्यात येणार आहेत.
पंजाबमध्ये सध्या अमली पदार्थ विकणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. पंजाबमधील अनेक तरुणमंडळी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने देखील पंजाबमधील अनेक महिला त्यांचे पती अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची तक्रार करत असल्याचे सांगितले होते, तसेच यावर लवकरात लवकर उपाय करण्याचे आदेश देखील दिले होते. त्यामुळे आता चंदिगढ प्रशासनाने डोप टेस्टचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून लग्नाआधी मुली त्यांच्या होणाऱ्या नवऱ्यांची तिथे डोप टेस्ट करू शकणार असल्याचे समजते.