शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:39 IST)

देशातील प्रत्येक शाळेत आता रोज एक तास खेळासाठी - जावडेकर यांची घोषण

देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया उपक्रम सुरू केला. या निमित्ताने देशभरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला मिळाले आहेत. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे, मैदानावर घडणारा हाच उद्याचा नवा भारत आहे. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियाच्या पुरस्कार वितरण प्रसंगी श्री. प्रकाश जावडेकर बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, केंद्रीय क्रीडा सचिव राहुल भटनागर, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर, अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) वंदना कृष्णा, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) उपमहासंचालक संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ऑलिम्पिक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी तथा सह सचिव ओंकार सिंग, स्टार स्पोर्टचे चैतन्य दिवाण आदी उपस्थित होते.