बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (12:40 IST)

हनुमान जयंती : दिल्लीमध्ये हनुमान जयंतीला झालेल्या दगडफेकी प्रकरणी 14 जणांना अटक

दिल्लीत जहांगीरपुरी भागात शनिवारी संध्याकाळी दोन समाजांमध्ये दगडफेक झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे.
 
 जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेदरम्यान कथित दगडफेक झाली आणि त्यानंतर जमाव हिंसक झाला.
 
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणूक सी ब्लॉक मशिदीजवळ पोहोचताच अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या काही साथीदारांसह तेथे पोहोचला.यानंतर त्यांनी मिरवणुकीत सहभागी लोकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. येथूनच गदारोळ सुरू झाला.या घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी 8 पोलीस कर्मचारी आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला.
 
तसंच यात एका पोलीस उप-निरीक्षकाला गोळी लागली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्त उषा रंगनानी यांनी दिली आहे.

शोभायात्रेदरम्यान सहभागी लोकांवर दगडफेकीचा प्रकार घडला. काही ठिकाणी आग लावण्याचे प्रसंगही घडल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीसच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश शहा यांनी दिले आहेत
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, "नागरिकांना मी शांततेचं आवाहन करतो. शांततेचं पालन करणं आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. त्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही. केंद्र सरकारने दिल्लीत शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा".
 
ते पुढे म्हणाले, "जहांगीरपुरी परिसरात शोभायात्रेदरम्यान सहभागी लोकांवर दगडफेक ही घटना अतिशय निंदनीय आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे".
 
परिस्थितीबाबत दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी दीपेंद्र पाठक सांगतात की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. वातावरण शांत आहे. आम्ही लोकांच्या सतत संपर्कात आहोत आणि शांतता राखण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करत आहोत. सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.