सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (23:05 IST)

दिल्लीत पाऊन न पडताही यमुनेला पूर कसा आला? 1978 पेक्षा आत्ताची पूर परिस्थिती वेगळी कशी?

दिल्लीत सध्या यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ही पातळी 208.6 मीटरच्याही पुढे गेली.
दिल्लीतल्या काही भागांमध्ये पूर आला आहे.
यापूर्वी 1978 मध्ये पाणी पातळी 207.49 मीटरवर पोहोचली होती. पाणी पातळी इथवर पोहोचण्याची ही शेवटची वेळ होती.
 
सध्या दिल्लीतील सखल भागांमध्ये पाणी भरलं असून या पाण्याची पातळी वाढत राहिल्यास निवासी भागातही पाणी शिरू शकतं.
 
सर्वसामान्यांमध्ये भीती
केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्लूसी) फ्लड मॉनिटरिंग पोर्टलनुसार, जुन्या दिल्लीतील पुलावरील पाण्याची पातळी बुधवारी पहाटे 4 वाजता 207 मीटर इतकी होती. 2013 नंतर पाण्याने पहिल्यांदाच इतकी पातळी गाठली आहे.
त्याचवेळी सकाळी आठपर्यंत त्यात वाढ पाणी पातळी 207.25 मीटर इतकी झाली. त्यामुळे दिल्लीतील खालच्या (सखल) भागात पाणी भरलं होतं.
 
दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून यमुना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.
 
सोमवारी रात्री पाण्याची पातळी 206 मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं.
 
बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी पूर आलेल्या भागात कलम 144 लागू केलंय. या कलमातंर्गत चारपेक्षा जास्त लोक विनाकारण एका ठिकाणी जमू शकत नाहीत.
 
दिल्लीत 1924, 1977, 1978, 1995, 2010 आणि 2013 मध्ये पूर आला होता. आता परिस्थिती 1978 च्या महापुरासारखी होऊ नये अशी भीती अनेकांना वाटत आहे.
 
1978 मध्ये काय झालं होतं?
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या 5 सप्टेंबर 1978 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत लिहिलं होतं की, "महाराणी बाग, न्यू फ्रेंड्स कॉलनी, जामिया मिलिया इस्लामिया आणि ओखला परिसरातील लोकांना परिसर रिकामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
बातमीत लिहिलं होतं की, 'यमुनेवरील चार पूल - जुना रेल्वे पूल, जिथे रेल्वे आणि वाहतूक दोन्ही चालते, वजिराबाद पूल, आयकर कार्यालयाजवळील पूल आणि ओखला येथील पूल 48 तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उत्तर दिल्लीतील 30 गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.'
 
बातमीनुसार, 'जी टी रोड पासून कर्नालकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका मोठ्या भागात पाणी शिरल्याने वाहतुक बंद करण्यात आली होती. शाहआलम धरणात एक-दोन ठिकाणी भेगा पडल्याने प्रशासनाने उत्तर दिल्लीतील सात वसाहतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला होता. नदीचं पाणी लडाखी बुद्ध विहाराजवळील रिंगरोडच्या काठापर्यंत पोहोचलं होतं.'
 
याशिवाय उत्तरप्रदेशमध्ये बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आल्याचंही बातमीत म्हटलं होतं.
 
यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढणार का?
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते.
 
त्याचवेळी हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील दोन दिवस उत्तराखंडमध्ये पाऊस सुरूच राहील.
 
याशिवाय उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
मात्र जैवविविधता तज्ज्ञ डॉ. फयाज खुदसर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, बुधवारी सकाळच्या तुलनेत दुपारी नदीचा प्रवाह कमी होता.
 
त्यांच्या मते, नदीच्या मागच्या बाजूने कमी पाणी सोडल्यामुळे प्रवाह कमी झाला आहे. आणि अशीच परिस्थिती राहिल्यास पाण्याचा प्रवाह आणखीन कमी होईल.
 
1978 पेक्षा परिस्थिती वेगळी आहे का?
डॉ.खुदसर यांचं म्हणणं आहे की, जे लोक पुरक्षेत्रात स्थायिक आहेत तेच या पुरामुळे बाधित आहेत.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "तुम्ही बघत असाल तर या पुराने दाखवून दिलंय की, जर दिल्लीच्या पूरक्षेत्राचं संरक्षण झालं नाही तर नदीची पाणी पातळी कुठपर्यंत जाईल."
 
ते म्हणतात की, 1978 च्या दरम्यान यमुना नदीची तटबंदी इतकी चांगली नव्हती त्यामुळे पाणी काही भागांमध्ये शिरलं. यावेळेस परिस्थिती इतकी वाईट नाहीये.
 
त्यांच्या मते, "आज तटबंदी असल्यामुळे पाणी पूर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहिलंय."
 
त्यांच्या मते, पूरक्षेत्र इतकं रुंद नसतं तर पाणी शहरात आणि लोकांच्या घरात शिरलं असतं.
 
ते म्हणतात, "जर पूरक्षेत्र आणखीन सुरक्षित पद्धतीने राखून ठेवलं तर आपण फक्त पुरापासूनच वाचणार नाही तर नदीही जिवंत ठेऊन पाण्याच्या कमरतेपासून वाचता येईल. आणि हा आपल्यासाठी धडा आहे."
 
त्यांच्या मते, पुराचं पाणी कसं साठवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे.
 
पूर का आला?
डॉ. खुदसर म्हणतात, "बऱ्याचदा दिल्लीत पाऊस पडत नाही आणि तरीही दिल्लीतील नद्या पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. ज्या पावसामुळे वाहणाऱ्या नद्या आहेत किंवा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्यांना पूर येणं सामान्य गोष्ट आहे. आणि नदीचं हेच जीवन आहे."
 
पण त्यांचं म्हणणं आहे की, वरच्या भागात पाणी अडवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. कारण जंगलं, गवताळ प्रदेश आणि जमीनी कमी झाल्या आहेत. पूर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे सखल भागात पाणी जास्त साचतं.
 
त्यामुळे वरच्या भागात पाणी अडवण्याची व्यवस्था करावी लागेल आणि तरच परिस्थिती बदलेल.
 
केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की,
 
"आमच्या निरीक्षणानुसार, हथिनीकुंड बॅरेजमधून जे पाणी सोडलं होतं ते गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिल्लीपर्यंत लगेच पोहोचलं. याच मुख्य कारण अतिक्रमण आणि गाळ असू शकतो. पूर्वी पाण्याच्या प्रवाहासाठी जास्त जागा होती. आता अरुंद क्रॉस-सेक्शनमधून पाणी जातं."
 
दिल्लीपासून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरियाणातील यमुनानगर बॅरेजमधून दिल्लीपर्यंत पाणी पोहोचायला सुमारे दोन ते तीन दिवस लागतात.
इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या नॅचरल हेरिटेज डिव्हीजनचे प्रधान संचालक मनू भटनागर यांनी दिल्लीतील यमुनेने उग्र स्वरूप धारण करण्याचं मुख्य कारण अल्पावधीत अतिवृष्टी असल्याचं सांगितलं आहे.
 
त्यांनी पीटीआयला सांगितलं की, "बराच वेळ एक समान प्रमाणात पाणी सोडल्यास अशी परिस्थिती निर्माण होत नाही, कारण पाण्याला जायला वेळ मिळतो."
 
पुरामुळे यमुनेत कोणते बदल झाले?
प्रचंड प्रवाहामुळे यमुनेचं प्रदूषण कमी झाल्याचं डॉ. फय्याज खुदसर सांगतात. ते म्हणतात की, "आता अशी परिस्थिती आहे की यमुनेचं संपूर्ण प्रदूषण वाहून गेलं आहे."
 
मात्र, परिस्थिती सामान्य झाल्यावर प्रदूषण पुन्हा वाढेल.
 
दिल्लीत नदीच्या खलाच्या बाजूला सुमारे 41,000 लोक राहतात. हा भाग पूरप्रवण असल्याने असुरक्षित आहे. दिल्ली विकास प्राधिकरण, महसूल विभाग आणि खासगी व्यक्तींच्या जमिनी याच भागात असल्याने नदीच्या पूरक्षेत्रावर वर्षानुवर्ष अतिक्रमण झालेलं आहे.
 
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात यमुनेने दोनदा धोक्याची पातळी ओलांडली होती. पाण्याची पातळी 206.38 मीटरपर्यंत पोहोचली होती.
 
2019 च्या ऑगस्ट महिन्यात 18 ते 19 तारखेच्या दरम्यान नदीमध्ये 8.28 लाख क्युसेक पाणी होतं, नदीचा प्रवाहही वाढला होता, पाण्याची पातळी 206.6 मीटरपर्यंत वाढली होती. 2013 मध्ये हीच पातळी 207.32 मीटरपर्यंत पोहोचली होती.






Published By- Priya Dixit