भ्रष्टाचारात भारत पुढेच
सरकारी कामे करण्यासाठी लाच घेण्याबाबत आणि पत्रकारांच्या सुरक्षितेतेबाबत भारत आशिया खंडातील सर्वात खराब देश असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. 2017च्या यादीत भारताचा क्रमांक 81वा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत या अहवालात 180 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016मध्ये भारताचा 79वा क्रमांक होता.
या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांचा क्रमांक पहिला लागतो. न्यूझीलंडला ८९ तर डेन्मार्कला ८८ गुण देण्यात आले आहेत. उलट सीरिया १४, दक्षिण सुदान १२ तर सोमालिया ९ असे गुण आहेत. या तीन देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होतो, असे या अहवालात म्हटले आहे. या क्रमवारीत चीन ७७ व्या स्थानी असून त्याला ४१ गुण देण्यात आले आहेत. ब्राझील ३७ गुणांसह ९६ व्या स्थानावर आहे. तर रशिया २९ गुणांसह १३५ व्या स्थानावर आहे.
या यादीतील देशांना ० ते १०० दरम्यान गुण दिले जातात. ज्या देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे त्यांना ० तर जिथे स्वच्छ कारभार होतो त्यांना १०० गुण दिले जातात. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील भारताला ४० गुण देण्यात आले आहेत. २०१५ मध्ये भारताला सर्वात कमी ३८ गुणे देण्यात आले होते. त्यानंतर यात कोणताही बदल झालेला नाही.