मलिक आणि देशमुखांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव
ईडीच्या कारवाईनंतर अटकेत असलेले ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परीक्षेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसांचा जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर सुनावणी घेण्यास अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. त्या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही नेते तुरुंगात आहेत. या दोन्ही नेत्यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जून या दिवशी जामीन मिळण्याची मागणी केलीय. त्या एका दिवसभरासाठी तुरुंगातून सुटण्याची याचिका त्यांनी केली होती. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर १० जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देशमुख आणि मलिक यांना मतदान करता आले नव्हते. कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. दोघांनी आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जून रोजी एक दिवसासाठी तुरुंगातून सोडण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दाखल केलेल्या जामीन अर्जात एक दिवसाची तुरुंगातून सुटका करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. राष्ट्रवादीच्या नेत्याचे अपील त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी न्यायमूर्ती एन. जे. जामदार यांच्या एकल खंडपीठासमोर हजर केले. न्यायमूर्ती जामदार यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १५ जून ही तारीख निश्चित केली.