मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (21:37 IST)

मणिपूर : एका व्यक्तीने आम्हाला टेबलखालून जिवंत ग्रेनेड काढून दाखवला आणि सांगितलं

manipur
दिव्या आर्य
मणिपूरची राजधानी इंफाळच्या विमानतळाबाहेर पडलात की तुम्हाला निरभ्र आकाश दिसतं. तिथल्या हवेतला ताजेपणा जाणवतो, तुमचा मोबाईल मात्र शांत असतो.
 
जवळपास तीन महिन्यांपूर्वी कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये ही दंगल सुरु झाली आणि त्यानंतर तिथे अनेकवेळा हिंसाचार झालाय. वेळोवेळी घडलेल्या या हिंसेच्या दहशतीमुळे मनात एक प्रचंड कोलाहल सुरु असला तरी त्याच्या अगदी विरुद्ध वातावरण इंफाळमध्ये आहे, तिथे एक नीरव शांतता पसरलीय.
 
तुम्हाला सत्य काय आहे हे माहिती नसेल तर मात्र इंफाळमध्ये सगळं काही शांत आणि सुरळीत आहे असं तुम्हाला वाटू शकतं.
 
मणिपूरमध्ये मोबाईल इंटरनेट बंद आहे. त्यामुळे या राज्याच्या एखाद्या कोपऱ्यात एखाद्याचं घर जाळलं गेलं असेल, पोलिसांच्याच गाडीवर हल्ला केला गेला असेल किंवा राज्याच्या एखाद्या भागात संचारबंदी लागू केली असेल तरी त्याची बातमी मात्र कुठेही मिळत नाही.
 
गंमत म्हणजे इंटरनेट नसल्यामुळे फोनची बॅटरीच उतरत नाही. मोबाईल दिवसभर चालू राहतो. सतत नोटिफिकेशन दाखवण्याची सवय असणारी तुमची मोबाईल स्क्रीन दिवसभरातून एकदाही चमकत नाही. दिवसा इंफाळच्या रस्त्यावरून धावणारी एखाद-दुसरी गाडी, बाजारात सुरु असलेली एकदोन दुकानं आणि रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाड्या बघून इथली परिस्थिती सामान्य असल्याचा आभास निर्माण होऊ शकतो.
 
आम्ही एका मोठ्या इमारतीच्या समोरून जात होतो तेव्हा दिसलं की त्या इमारतीवर बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे चौकोनी रकाने आहेत. मात्र ही इमारत संपूर्णपणे जाळून टाकण्यात आलीय, त्यामुळे ते चौकोन काळवंडले आहेत.
 
इथे एक मोठा मॉल होता आणि या जळलेल्या चौकोनी खोबण्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची दुकानं होती. शाळेच्या इमारतीही अशाच परिस्थितीत उभ्या आहेत, मे महिन्यात घडलेल्या हिंसाचाराच्या गडद खुणा बनून.
 
अनेक ठिकाणी 'रिलीफ कॅम्प'चे बोर्ड लावले गेले आहेत. यापैकी काही मदत शिबिरं सरकारी आहेत, काही शिबिरं राजकीय पक्षांची आहेत तर काही सामाजिक संघटनांनी देखील अशी शिबिरं उभारली आहेत. यापैकी बहुतांश कॅम्प हे शाळांच्या इमारतींमध्ये उभारण्यात आलेली आहेत.
 
शाळा बंद आहेत आणि इंटरनेट बंद असल्यामुळे मुलांकडे ऑनलाईन शिकण्याचा पर्यायही नाहीये. तीन आठवड्यांपूर्वी सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
 
मैदानी प्रदेशात राहणारे मैतेई आणि हिंसाचारानंतर डोंगराळ भागात निघून गेलेल्या कुकी समुदायामध्ये खूप मोठी दरी निर्माण झालीय. मैदानी आणि डोंगराळ मणिपूरमध्ये निर्माण झालेला हा संघर्ष हेच मणिपूरचं सद्यस्थितीतलं वास्तव आहे.
 
दुभंगलेलं मणिपूर
 
जातीय हिंसाचार घडण्याआधी मणिपूरच्या मैदानी प्रदेशात मैतेई बहुसंख्य होते. मणिपूरच्या राजधानीत मोठमोठ्या शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी असल्याने कुकी समुदायाचे लोकही इथे येऊन राहू लागले.
 
हिंसाचार उफाळल्यानंतर मात्र हे सगळे मैदानी प्रदेश सोडून डोंगराळ भागात असणाऱ्या छोट्या छोट्या कुकी गावांमध्ये निघून गेले आहेत. डोंगराळ भागातल्या काही गावांमध्ये राहणारे मैतेई देखील ती गावं सोडून इंफाळच्या रिलीफ कॅम्पमध्ये येऊन राहू लागले आहेत.
 
मणिपूरच्या मध्यावर वसलेल्या इंफाळ खोऱ्याच्या चहुबाजुंनी एक सीमा तयार झालीय. यामुळे मैतेई डोंगराळ भागात जाऊ शकत नाहीयेत आणि कुकींना खोऱ्यात येऊन राहण्याची परवानगी नाहीये.
 
मणिपूरात सध्या मुस्लीम सुरक्षित आहेत
मैतेई आणि कुकी समुदायात तयार झालेली ही दरी केवळ तेच ओलांडून जाऊ शकतात ज्यांचे या दोन्ही समुदायासोबत कसलेही शत्रुत्व किंवा मैत्र नाही.
 
हिंदुबहुल मैतेई आणि ख्रिश्चनबहुल कुकी परिसरामध्ये येण्याजाण्यासाठी लोक मुस्लिम वाहनचालकांची मदत घेत आहेत, मणिपूरमध्ये मुस्लीम असणं सध्यातरी सुरक्षित आहे.
 
मुख्यमंत्री बिरेन सिंह अजूनही डोंगराळ भागात असणाऱ्या कुकींना भेटायला गेलेले नाहीत. ते स्वतः मैतेई असल्याने त्यांनी असं केल्याचं बोललं जातंय.
 
मणिपूरच्या राज्यपाल अनुसया उईके या मात्र मणिपूरच्या नाहीयेत. मैतेई आणि कुकी प्रदेशात सरकारने लावलेल्या मदत शिबिरांचा त्यांनी दौरा केला आहे. राज्यपालांच्या ताफ्यात असणाऱ्या गाड्यांचे चालकही डोंगराळ आणि मैदानी प्रदेशात तयार झालेल्या या सीमांवर बदलले जातात अशी परिस्थिती आहे.
 
सरकार असून नसल्यासारखी परिस्थिती
कुकी आणि मैतेई समुदायात निर्माण झालेली ही सीमारेषा केवळ एक सरळ रेषेत केलेली विभागणी नाहीये. किंबहुना हा कित्येक किलोमीटर मोठा परिसर आहे. मैतेईंच्या प्रदेशातून निघून कुकींच्या भागात दाखल होईपर्यंत तुम्हाला अनेक तपासणी नाक्यांमधून प्रवास करावा लागतो.
 
यातल्या पहिल्या तपासणी नाक्यावर मैतेई समुदायातले लोक तर शेवटच्या तपासणी नाक्यावर कुकी समुदायातले लोक तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये भारतीय सैन्य आणि स्थानिक पोलिसांच्या चौक्या आहेत.
 
कुकी आणि मैतेई समुदायाच्या लोकांनी कुठे मोठमोठ्या गोण्या टाकून, कुठे काटेरी तारांचे कुंपण टाकून तर कुठे अवाढव्य पाईप टाकून रस्ता आडवलाय. या तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आलेल्या लोकांकडे हत्यारं आहेत.
 
या नाक्यांवर प्रत्येक गाडीची कसून तपासणी करण्यात येते, गाडीत एखादं हत्यार तर नाहीये ना हे बघितलं जातं.
 
एवढंच काय तर गाडी चालवणाऱ्या चालकाचं ओळखपत्र तपासलं जातं, तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आहे याची माहिती घेतली जाते जेणेकरून त्या चालकाला दुसऱ्या प्रदेशात जाण्याचा हक्क आहे की नाही याची खात्री केले जाते.
 
वेगवेगळ्या समुदायांनी उभारलेल्या या तपासणी नाक्यांना पार करून पुढे जाण्याचा अनुभव थोडासा विचित्र आहे, या राज्यात सरकार असूनही नसल्यासारखं असल्याचा पुरावा म्हणजे ते नाके आहेत.
 
मणिपूरमध्ये शहरात राहणाऱ्या नागरिकांकडे तर हत्यारं आहेतच पण ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांकडे देखील ती आहेत. ही हत्यारं अगदी स्वस्तात मिळतात आणि त्यामुळे लोक त्यांच्या घरांची आणि कार्यालयांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना जवळ बाळगतात.
 
राजधानीचं शहर असणाऱ्या इंफाळमध्ये तर एका व्यक्तीने आम्हाला अगदी सहज त्यांच्या टेबलाखालून एक जिवंत ग्रेनेड काढून दाखवला.
 
हा ग्रेनेड स्वसंरक्षणासाठी बाळगल्याचं ते म्हणाले होते आणि बाजूला त्यांच्या लहान लहान मुली खेळण्यातल्या बंदुका घेऊन खेळत होत्या.
 
हिंसाचाराची भीती
या राज्यातला जास्तीत जास्त तणाव हा दोन समुदायांच्या सीमेवर तयार झालाय. इंफाळ खोऱ्याच्या चारही बाजूंनी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जळालेली घरे आणि तुटलेली वाहने विखुरलेली आहेत.
 
या गावातले लोक कधीच पळून गेले आहेत. त्यांनी मागे सोडलेल्या जळलेल्या इमारतींमध्ये आता सैन्याचे जवान राहत आहेत.
 
जवळपास रोजच इथे दोन्ही समुदायांमध्ये गोळीबार सुरु होतो.
 
कधी लोकांच्या हत्या केल्या जातात तर कधी त्यांनी मागे सोडून गेलेली दुकानं जाळून टाकल्याच्या बातम्या येतात. भाजीपाला, फळे, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
 
या हिंसाचाराच्या सावटाखाली असताना देखील मणिपूर सरकारने राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा आणि सरकारी कार्यालयं उघडण्याचा आदेश दिलेला आहे.
 
इंफाळच्या खोऱ्यात काही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत पण केवळ काही पालकच त्यांच्या मुलांना अशा वातावरणामध्ये शाळेत पाठवायला तयार होत आहेत.
 
डोंगराळ भागातल्या शाळा मात्र अजूनही बंदच आहेत. त्या भागात असणाऱ्या मदत शिबिरांमध्ये काम करणारे स्वयंसेवक तिथल्या मुलांना थोडंफार शिकवत आहेत पण रहायला घरं नसतांना, असलेली घरं जाळून टाकलेली असतांना या चिमुरड्यांचं मन अभ्यासात लागेल का? हा खरा प्रश्न आहे.
 
बहुतांश सरकारी कार्यालयं मैदानी प्रदेशात
'नो वर्क, नो पे' म्हणजे काम नाही तर पगार नाही हे धोरण सरकारने लागू केल्यामुळे मैतेई समुदायातील नोकरदारवर्ग पुन्हा कामावर रुजू झालाय पण कुकी समुदायातील सरकारीं नोकरदारांना मात्र पुन्हा मैदानी प्रदेशात जाऊन नोकरी करणं शक्य नसल्याचं त्यांचं मत आहे.
 
दोन समुदायांमध्ये निर्माण झालेली ही सीमारेषा एवढी गडद झालेली असताना या हिंसाचाराच्या आधी असणारी परिस्थिती कशी निर्माण होईल हा खरा प्रश्न आहे.
 
कारण मैतेई आणि कुकी यांचे एकमेकांशी जोडलेले व्यवसाय, नोकऱ्या आणि जीवन पुन्हा कसे पूर्ववत होतील याचं उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही.
 
सूर्य मावळतीकडे झुकताना मणिपूरात नीरव शांतता पसरलेली असते आणि आजही रात्रीच्या वेळी तिथे संचारबंदी लागू केलेली आहे.
 
मणिपूरमधला हा काळोख केवळ रात्र झाल्यामुळे पसरला नाहीये तर द्वेष आणि नैराश्याचे आवाज इथे मजबूत झाले आहेत आणि शांतता प्रस्थापित करू पाहणाऱ्यांना त्यांचाच समुदाय त्यांच्यावर यामुळे नाराज होईल अशी भीती वाटतीय.
 
विशेष म्हणजे मोबाईल इंटरनेट नसूनही दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याचा व्हीडिओ मात्र प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचलाय.
 
कुठेतरी क्वचित मिळणाऱ्या वायफायचा वापर करून इंटरनेटशिवाय चालणाऱ्या शेअरिंग ॲपचा वापर करून या व्हीडिओची देवाणघेवाण केली जातेय.
 
व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओसोबत लोकांमध्ये प्रचंड असंतोष, दुःख आणि अन्यायाची जाणीव पसरत चालली आहे. मणिपूरच्या दोन्ही समुदायांमध्ये केवळ ही दहशत, हा असंतोष आणि या दुःखाचीच कसल्याही चौकशीशिवाय देवाणघेवाण सध्यातरी शक्य आहे.