बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मार्च 2018 (16:46 IST)

मनोहर पर्रीकर अजूनही इस्पितळातच

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी पाचव्या दिवशीही इस्पितळातच आहेत.  ते वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गोव्यातील प्रशासनावर परिणाम झाल्याची टीका आता विविध घटकांमधून होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी पदाचा ताबा दुस-या कुठच्याच मंत्र्याकडे दिलेला नाही. ब-याच फाईल्स प्रलंबित उरल्या आहेत. कारण मुख्यमंत्र्यांकडे एकूण 23 खाती आहेत. त्यातही अर्थ, खाण, गृह, अबकारी, पर्यावरण, उद्योग अशी खाती ही जास्त महत्त्वाची आहेत. 

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगासारखी स्थिती असल्याचे मत केंद्रीय कायदा खात्याचे माजी मंत्री रमाकांत खलप यांनीही एके ठिकाणी व्यक्त करून राज्यपालांनी किंवा पंतप्रधानांनी अशा परिस्थितीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी खलप यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनीही मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी खरी माहिती लोकांसमोर भाजपाने ठेवावी, अशी मागणी केली व सगळी प्रशासकीय यंत्रणा सध्या कोलमडल्याचे म्हटले आहे. 

गेल्या रविवारी डिहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाच्या त्रासामुळे बांबोळी येथील गोमेकॉ या सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.