बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2018 (08:55 IST)

श्रीमंत शहराच्या यादीत मुंबई १२ वी, ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ चा अहवाल

मुंबईला ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालात श्रीमंत शहराच्या यादीत 12 वे स्थान पटकावले आहे. मुंबईची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलरची असून येथे 28 अब्जाधीश राहतात, असे अहवालात म्हटले आहे. ही पाहणी करताना त्या-त्या शहरातील लोकांकडे असलेल्या खासगी संपत्तीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यात मालमत्ता, रोख, शेअर्स, व्यवसाय आदींचा समावेश आहे. सरकारी निधी मात्र यातून वगळण्यात आले आहेत.

एकूण 15 श्रीमंत शहरांचा या पाहणीत समावेश आहे. मुंबईनंतर टोरांटो (944 अब्ज), फ्रँकफ्रूट (912 अब्ज) आणि पॅरिस (860 अब्ज) या शहरांचा नंबर लागतो. अब्जाधीशांच्या लोकसंख्येतही मुंबईने पहिल्या 10 शहरांमध्ये स्थान पटकावले आहे. एकूण 28 अब्जाधीश मुंबईत राहत असून त्यांच्याकडे एक अब्ज डॉलरची संपत्ती आहे. संपत्तीच्या वाढीबाबत पुढील दहा वर्षांत मुंबईचा वेगाने विकास होणार असून उद्योग, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि मीडिया या क्षेत्रांचे माहेरघर असल्याचे मुंबईबाबत अहवालात म्हटले आहे.

या यादीत न्यूयॉर्कने जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून पहिले स्थान पटकावले असून येथील लोकांकडे तीन ट्रिलियन डॉलरची संपत्ती आहे. 2.7 ट्रिलियन डॉलरच्या संपत्तीसह लंडन दुसर्‍या, तर सॅनफ्रान्सिसको तिसर्‍या स्थानावर आहे. बीजिंग, शांघाय, सिडनी या शहरांचादेखील या यादीत समावेश आहे. मुंबईबरोबरच ही शहरेदेखील वेगवान विकसित होत असल्याचे म्हटले आहे.