बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (07:33 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, १० जूनला दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, १० जूनला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. देशात भाजप भीतीचे वातावरण निर्माण करत आहे , लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे, देशात महागाई, धार्मिक भीती पसरवली जातेय, याबाबत देशात पर्याय तयार केला जाणार, भाजपविरोधात सगळ्यांना एकत्र करून ताकद उभारली जाणार, लोकांना पर्याय हवा आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडलीय. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली आहे. आगामी ५ राज्यांच्या निवडणुका, पक्षाची संघटनात्मक बांधणी, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्यावर धोरण ठरवण्याबाबत बैठक होती. आगामी काळात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. कोविड काळात बेरोजगारी वाढली, व्यापार ठप्प झाला, लोकांना नुकसान झालं, महागाई वाढली यावरून आगामी काळात आंदोलन करणार असल्याचंही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
 
राष्ट्रवादीच्या या बैठकीत ५ राज्यांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशाबाबत अखिलेश यादव यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. तसेच गोवा, मणिपूरबाबतही चर्चा झाली असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीही जोमाने उतरणार आहे.
 
ओबीसी आरक्षणाबाबत संसदेत कायदा आणावा
ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढाई केली, पण काही लोक, ज्यांना भाजपचे समर्थन आहे, ते कोर्टात गेले आणि देशात इतर राज्यात असलेला कायदा रद्द झाला अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली आहे. आम्ही मागणी केली केंद्राने याबाबत संशोधन करावं, आरक्षणाचा कायदा संसदेत आणावा असंही मलिक म्हणाले आहेत.
 
कृषी कायदे रद्द झाल्याबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन
वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनानंतर अखेर तिन्ही कृषी कायदे सरकारला रद्द करावे लागले, त्यासाठी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. तर राष्ट्रवादी इथून पुढे कायम शेतकऱ्यांसोबत असेल असंही त्यांनी सांगितले आहे.