सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (11:38 IST)

नीरव मोदी, चोक्सीचे बंगले पाडण्याचे आदेश

कोट्यवधींचा घोटाळा करणारा हिरेव्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांना महाराष्ट्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. मोदी आणि चोक्सी यांचे रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरूडधील अनधिकृत बंगले तोडण्याचे आदेश  देण्यात आले.
 
नीरव मोदी, चोक्सीचे बंगले पाडण्याचे आदेश पर्यावरण आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरूड किनार्‍यांवर हे अनधिकृत बंगले बांधण्यात आले आहेत. ते तोडण्याचे आदेश राज्य सरकारने आज दिले. बँक घोटाळा करून परदेशात पळालेला आरोपी नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख यांच्यासह मुंबईतील अनेक उच्चभ्रूंचे अलिबाग आणि मुरूडच्या किनार्‍यावर बंगले आहेत. या ठिकाणी काही राजकारण्यांसहित बॉलिवूड कलाकारांचेही बंगले आहेत. धक्कादायक म्हणजे राजकारण्यांनी दुसर्‍यांच्या नावावर बंगले विकत घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय हे सर्व बंगले पर्यावरण आणि सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आले आहेत. केवळ बड्या लोकांचे हे बंगले असल्याने सरकारी यंत्रणांकडे तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नव्हती. शेवटी या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. तेव्हा उच्च न्यायालयाने पर्यावरण आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधलेले हे बंगले पाडण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित अधिकार्‍यांनाही धारेवर धरले होते.
 
न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी संबंधित अधिकार्‍यांची मंत्रालयात बैठक घेतली. पर्यावरण विभागाच्या अधिकार्‍यांसह रायगडचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत कदम यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबाग आणि मुरूड समुद्र किनार्‍यांवर असलेले अनधिकृत बंगले तत्काळ पाडण्यात यावेत, तसा अहवाल राज्य सरकारला सादर करावा, असे आदेश दिले. अलिबाग आणि मुरूड येथील अनधिकृत बंगल्यांच्या मालकांना 1 लाख रुपये दंड आणि पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते. बंगले पाडण्याची कारवाई महिनाभरात करण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. दरम्यान, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनीही हे बंगले तोडण्याचे आदेश मिळाल्याचं स्पष्ट केले. त्यात मोदीचा बंगला असल्याचेही तेम्हणाले.