शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 मार्च 2024 (10:47 IST)

दिल्लीत नमाज पठण करणाऱ्याला पोलिसाने लाथा मारल्या, पुढे काय घडलं - ग्राउंड रिपोर्ट

Delhi Police
दिनांक 8 मार्च 2024. दिल्लीचा इंद्रलोक परिसर. सायंकाळचे सहा वाजले होते.ठिकठिकाणी दिल्ली पोलिसांचे जवान दिसत होते. नुकत्याच आलेल्या एका बसमधून केंद्रीय पोलीस दलाचे जवान उतरून रस्त्यांवर त्यांची तैनात होत होते.
 
मेट्रो स्टेशनद्वारे मक्की मशिदीकडं जाणाऱ्या रुंद मार्गावरून तरुणांचा एक गट घोषणा देत पुढं सरकत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामध्ये बहुतांश लहान मुलं आणि तरुण होते. अगदीच एखादी ज्येष्ठ व्यक्तीही होता.
 
थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं 'अल्लाह हू अकबर' च्या घोषणा ऐकायला मिळत होत्या. त्यांच्याबरोबर पोलीसही घेराव करून चालत होते.
 
काही वेळातच हे आंदोलन संपलं. पण तरीही मशिदीजवळची गर्दी तशीच राहिली.
इंद्रलोकच्या मक्की मशिदीबाहेर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना पोलीस कर्मचाऱ्यानं लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या काही मिनिटांतच लोक जमा व्हायला लागले होते.
 
पोलीस चौकीला घेराव घालणाऱ्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी शक्तीचा वापरही केला.
 
नमाज अदा करताना पुढं वाकलेल्या व्यक्तीला पोलिस कर्मचाऱ्यानं लाथ मारल्याचा व्हिडिओ जसजसा लोकांपर्यंत पोहोचत होता, तसा लोकांचा आक्रोश वाढत गेला. पण दिल्ली पोलिसांनी लगेचच या घटनेची दखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं.
 
"या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे. परिसरात पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्याबरोबरच महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. घटनेत सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांवर जराही विलंब न करता कारवाई करण्यात आली आहे," असं दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.
 
पोलीस कर्मचाऱ्याला पदावरून हटवल्यानंतरही आंदोलन करणाऱ्या लोकांचा संताप कायम होता.
 
"या घटनेनं देशातल्या प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचं मन दुखावलं गेलं आहे. आम्ही दुय्यम दर्जाचे असल्याची जाणीव आम्हाला करून दिली जात आहे. पण तसं नसल्याचं आम्ही दाखवून देऊ," असं एका तरुणानं म्हटलं. भीम आर्मीशी संबंधित असल्याचं त्यानं सांगितलं.
 
निलंबनानंतर आंदोलक झाले शांत
घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी परिसरातील लोक आणि धर्मगुरूंबरोबर चर्चाही केली. शांतता कायम राखण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.
 
सायंकाळ होता-होता वातावरण शांत झालं. त्यानंतर बहुतांश लोक घरी निघून गेले. पण तरीही सुरक्षेच्या दृष्टीनं विचार करून केंद्रीय पोलीस दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात होते.
डोक्यावर टोपी असलेल्या एका लांब दाढीवाल्या व्यक्तीनं म्हटलं की, "पोलीस आयुक्तांशी मौलाना बोलले असून सर्वांना घरी जायला सांगण्यात आलं आहे."
 
"दिल्ली पोलिसांनी नमाजींवर लाठी हल्ला करून फार वाईट केलं आहे. त्याच्या विरोधातच आम्ही रस्त्यांवर उतरलो आहोत. फक्त निलंबन करणं पुरेसं नाही. अशा लोकांना पोलीस दलातून कायमचं बरखास्त करावं," असं त्या ठिकाणी असलेली एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणाली.
 
"इंद्रलोकमध्ये कधीही असं घडलं नव्हतं," असंही ती व्यक्ती पुढे म्हणाली.
 
शुक्रवारी मशिदीत होते गर्दी
इंद्रलोक उत्तर दिल्लीचा एक मुस्लीमबहुल परिसर आहे. याठिकाणी सुमारे 15 हजार मुस्लीम राहतात.
 
इंद्रलोकमधील मक्की मशीद एक मोठी मशीद आहे. त्यात हजारो लोक एकत्र नमाज पठण करू शकतात. तिथून अंदाजे तीनशे मीटर अंतरावर आणकी एक मोठी मशीद आहे. तिचं नाव मोहम्मदी मशीद.
 
पण दोन मोठ्या मशिदी असूनही शुक्रवारी नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मशिदीतील क्षमतेपेक्षा जास्त वाढत असते.
 
मोहम्मदी मशिदीच्या जवळ अत्तराचं दुकान चालवणारे मोहम्मद फय्याद म्हणाले की, "मी 1976 पासून इथं राहत आहेत. इंद्रलोक परिसराला 48 वर्षे झाली आहेत. आतापर्यंत कधीही असं घडलं नव्हतं. ही अशाप्रकारची पहिलीच घटना आहे."
"इथं कधीही कलम 144 लागू होत नाही. सर्व धर्माचे लोक इथं एकत्र मिळून राहतात. इंद्रलोकमध्ये अशी घटना घडली, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं," असं फय्याद म्हणाले.
 
मोहम्मद फय्याद यांनी जीवनातला बहुतांश काळ याठिकाणीच घालवला आहे. ते या ठिकाणीच मशिदीत नमाज पठण करतात.
 
"लोकसंख्या वाढली पण मशिदीची क्षमता कमी आहे. शुक्रवारी गर्दी वाढत असल्यानं दोन वेळा नमाज पठण केलं जातं," असं फय्याद म्हणाले.
 
फय्याद यांच्या मते, शक्यतो नमाज नेहमी मशिदीच्या आतच होते. पण कधी-कधी नमाजींची संख्या वाढल्यानं लोक रस्त्यावरही नमाज पठण करतात.
 
नमाजींना अशाप्रकारे लाथ मारल्याचं दुःख त्यांनी बोलून दाखवलं.
 
'निवडणुकीपूर्वी वातावरण बिघडायला नको'
इंद्रलोकच्या मशीद समितीशी संलग्न लोकांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.
 
पण याठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते नफीस अहमद म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी अशा घटनांचा वापर धर्मांधता पसरवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यासाठी शांत राहणंच अधिक योग्य ठरतं.
 
"निवडणुका येत आहेत. द्वेषाचं राजकारण करणाऱ्या लोकांकडून अशा घटनांचा वापर धर्मांधता पसरवण्यासाठी करतात. त्यामुळं शांत राहणंच योग्य आहे," असं नफीस म्हणाले.
 
"सध्या पोलिसांना कारवाई तर केली आहे. पण पुढं असं काही झालं तर न्यायालयाचा मार्गही अवलंबला जाऊ शकतो," असंही नफीस म्हणाले.
 
इंद्रलोकमध्ये एका चहाच्या दुकानावर बसून काही ज्येष्ठ लोक चर्चा करत होते. त्यापैकी काहींनी, मुस्लीमांनी धैर्यानं वागायला हवं. अशा घटनांनंतर आपण रागावर नियंत्रण ठेवायला हवं, असं मत मांडलं.
 
"जे घडलं, ते अत्यंत वाईट घडलं. पण त्यामागं काहीही हेतू नव्हता हे लक्षात घ्यायला हवं. निवडणुका येणार आहेत. काहीही होऊ शकतं. लोकांनी समजूतदारपणा आणि धैर्यानं वागलं पाहिजे," असं या ज्येष्ठांचं म्हणणं होतं.
 
मुस्लीम तरुणांचा संताप
काही तरुण मात्र या घटनेनं प्रचंड संतापलेले होते. ते या घटनेचा संबंध त्यांच्या धार्मिक ओळखीशी जोडू पाहत होते.
 
"अशा प्रकारचं गैरवर्तन हे केवळ एका मुस्लीमाबरोबरच केलं जाऊ शकतं. एकीकडं प्रशासन कावडीयांवर फुलं उधळतं तर दुसरीकडं नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथ मारतात. तुम्हीच सांगा यावरून काय लक्षात येतं," असं वीस वर्षांच्या एका तरुणानं म्हटलं.
 
इंद्रलोक हा शांत परिसर आहे. 2020 मध्ये इथं सीएए विरोधातही आंदोलन झालं होतं. पण कधीही धार्मिक हिंसाचार झाला नाही.
 
"इथं कधीही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली नाही. मी तैनात होतो तेव्हा आम्ही मशीद समितीकडून शुक्रवारी एकापेक्षा जास्त वेळा नमाज पठण करण्याची विनंती केली. ती मान्यही करण्यात आली," असं इंद्रलोक पोलिस चौकीत तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांच्या एका कर्मचाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
"साधारणपणे या परिसरात शांतता असते. आजच्या घटनेनंतर लोकांमध्ये आक्रोश होता. पण सायंकाल होईपर्यंत सगळे लोक घरी परतले," असंही ते म्हणाले.
 
भारतातील मुस्लीम या घटनेकडं सातत्यानं वाढणारा द्वेष आणि भेदभावाचा परिणाम अशा दृष्टीनं पाहत आहेत.
 
तरुण नेते आणि 'व्हॉलंटियर अगेन्स्ट हेट' चे संयोजक डॉ. मेराज यांनी याबाबत मत मांडलं. "देशात ज्याप्रकारे द्वेष पेरला जात आहे, हा त्याचाच परिणाम आहे. नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला मारणं हे घृणेचं बिभत्स उदाहरण आहे."
 
"मीडिया आणि सोशल मीडियानं मुस्लिमांच्या विरोधात एक वातावरण तयार केलं आहे. हा त्याचाच परिणाम आहे. संविधान देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देतं. एकीकडं कावडींवर फुलं उधळली जातात आणि दुसरीकडं नमाज पठण करणाऱ्या मुस्लिमांना लाथ मारली जात आहे. मुस्लीम रोज देशात ज्या भेदभावाचा सामना करतात, हे त्याचंच उदाहरण आहे," असं ते म्हणाले.
 
'घटना पोलिसांच्या प्रतिमेवरील डाग'
पोलीस ही एक धर्मनिरपेक्ष संस्था आहे. त्यामुळं नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला लाथ मारण्याच्या या घटनेनंतर दिल्ली पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी विक्रम सिंह यांच्या मते, ही अत्यंत आक्षेपार्ह घटना आहे.
 
"यात असंवेदनशीलतेबरोबरच प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाचा अभावही स्पष्टपणे जाणवतो" असंही विक्रम सिंह म्हणाले.
 
"या घटनेनं पोलिसांवर एकप्रकारचा डाग लागला असून तो सहजासहजी धुतला जाणार नाही. तसं पाहता ही काही सेकंदांची घटना असली तरी त्याचा आवाज आणि नकारात्मकता अनेक वर्षांपर्यंत कायम राहील," असं विक्रम सिंह म्हणाले.
दिल्ली पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केलं. तसंच त्याच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू केली होती.
 
पण विक्रम सिंह यांच्या मते, निलंबनाची कारवाई पुरेसी नाही. तर खटला दाखल करायला हवा.
 
"फक्त निलंबन पुरेसं नाही. त्यांच्या विरोधात खटलाही दाखल व्हायला हवा. तसंच त्यांना सेवामुक्त करायला हवं," असंही विक्रम सिंह म्हणाले.
 
त्याचवेळी या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिसांच ब्रँड अॅम्बेसेडर समजता कामा नये, असंही विक्रम सिंह म्हणाले.
 
"पोलीस एक धर्मनिरपेक्ष संघटना आहे. अशी परिस्थिती संवेदनशीलता आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून हाताळायला हवी. पोलिसांनी कोणालाही अल्पसंख्याक दृष्टीकोनातून पाहायला नको," असंही विक्रम सिंह म्हणाले.
 
"पोलिसांचं काम फुलं उधळणंही नाही किंवा कोणाला नमाज पठण करताना पाहून लाथ मारण्याचंही नाही. पोलिसांना सर्वांना समान दृष्टीनं पाहण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. एका व्यक्तीमुळं संपूर्ण पोलिस दलाला नावं ठेवता येणार नाहीत," असंही ते म्हणाले.
 
Published By- Priya Dixit