रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (14:47 IST)

राम मंदिर उभारणीला रामनवमी किंवा अक्षय तृतीयेचा मुहूर्त

गोविंददेव गिरी महाराजांची माहिती
राम मंदिराच्या पायाभरणीसाठी अक्षय तृतीया किंवा रामनवीच्या मुहूर्ताचा विचार होत असल्याचे गोविंददेव गिरी (आचार्य किशोरजी व्यास) महाराज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच मंदिर उभारणीसाठीदोन वर्षांहून अधिक कालावधी लागणार नाही असेही त्यांनी म्हटले. अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने एक ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा देखील केली. 
 
मोदींच्या घोषनेनंतर यावर लगेच कार्यवाही करत ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून यातील 15 लोकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून पुण्यातील स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले होते. याच गोविंददेव गिरी महाराजांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्ताची माहिती दिली आहे. या प्रसंगी अशोक सिंघल यांची आठवण येत असल्याचे गोविंददेव गिरी महाराज म्हणाले. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेलो असल्याने मला मंदिर उभारण्याची आधीपासून माहिती आहे. मंदिर उभारण्याचे काम दोन वर्षांपर्यंत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
 
राम मंदिरासाठी 15 सदस्यीय ट्रस्ट स्थापन, पुण्यातल्या 'या' महाराजांचाही समावेश ट्रस्टमध्ये या 15 जणांचा समावेश 
1. के. परासरन (सुप्रीकोर्टातील वकील)
2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज)
3. जगद्‌गुरु मध्वाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर)
4. युगपुरुष परानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार)
5. स्वामी गोविंददेव गिरी (आर्चाय किशोरजी व्यास, प्रवचनकर्ता)
6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज)
7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर)
8. कामेश्वर चौपाल (पाटणा)
9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही अखाडा, अयोध्या)
10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य 
11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य 
12. केंद्राचा प्रतिनिधी
13. राज्याचा प्रतिनिधी
14. अयोध्येचे जिल्हाधिकारी
15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष  
सरकारने राम मंदिरासाठी ज्या ट्रस्टची निर्मिती केली आहे त्या ट्रस्टचा पत्ता के. परासरन यांचे घर असणार आहे. राम मंदिर प्रकरणात अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात केस लढणार्‍या के. परासरन यांचा पत्ता आर-20 ग्रेटर कैलाश पार्ट वन, नवी दिल्ली असा आहे.