ग्रामीण भागाने करोना संक्रमण प्रभावीपणे रोखले
करोना व लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, यावेळी मोदी यांनी स्थानिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “अभियानाचा प्रारंभ करताना ग्रामस्थांशी संवाद साधल्यानं दिलासा मिळाला आहे. करोनाचा शिरकाव झाल्यानंतर अडकलेल्यांना मदत पोहोचवण्याचं काम केलं. घरी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे सुरू केली. ग्रामीण भारतानं करोनाचं संक्रमण प्रभावीपणे रोखलं आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या संपूर्ण युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे. इतकी लोकसंख्या असताना करोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आपण जे केलं तितकं काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम पाश्चिमात्य देशात झालं असतं, प्रचंड कौतुक झालं असतं. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत. पण, मी तुमचा जय जयकार करत राहणार आहे. गावांना आणि गावातील लोकांना सांभाळणाऱ्यांना मी नमन करतो,”असं मोदी म्हणाले.