गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (13:52 IST)

सलमानला जामिन मिळणार का ?

काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानच्या जामिन अर्जावर आज जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमानचे वकील सकाळी तुरुंगात त्याला भेटले. दोघांमध्ये जामिनासंदर्भात तब्बल तासभर चर्चा झाली. आता सकाळी साडे दहा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्याचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान जोधपूरसाठी रवाना झाले आहेत. त्यासोबतच निर्माते साजिद नाडियाडवालाही जोधपूरला पोहोचतील. नाडियाडवाला यांनी बागी 2 या सिनेमाची सक्सेस पार्टीही रद्द केली.
 
दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी जोधपूर तुरुंगात करण्यात आली. त्याला कैदी क्रमांक 106 देण्यात आला आहे. जोधपूर तुरुंगात त्याने संपूर्ण रात्र काढली. चार चादरी घेऊन तो रात्रभर जमिनीवर झोपला. तुरुंगातलं जेवणही त्याने नाकारलं. सलमानला वरण, पत्ता गोबी आणि चपाती देण्यात आली. मात्र त्याने या जेवणाला नकार दिला. तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत सलमानचा रक्तदाब वाढला होता, जो नंतर सामान्य झाला.