ईडीच्या चौकशीपासून राऊत कुटुंबीय दूर का पळत आहेत, सोमय्या यांचा सवाल
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीच्या चौकशीपासून राऊत कुटुंबीय दूर का पळत आहेत, अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ''ईडीचे हे तिसरे समन्स आहे. मात्र, तरीही संजय राऊत यांचे कुटुंबीय ईडीसमोर हजर राहत नाहीत. संजय राऊत कुटुंबीय दूर का पळत आहेत? पीएमसी बँक, एचडीआयएल बँक, प्रवीण राऊत आणि संजय राऊत कुटुंबात झालेल्या कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत या परिवारात नेमके काय विशेष नाते आहे?'', असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी ट्विट करून विचारला आहे.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी रुपये चोरले असून, एचडीआयएल आणि प्रवीण राऊत कुटुंबात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोन कुटुंबातही कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या दोन्ही परिवाराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून, हा पैसा कुठून आला? आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.