1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (08:03 IST)

श्रीहरिकोटा : महत्त्वाकांक्षी मोहीम, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुकता शिगेला

Chandrayaan 3
श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-३ आता फक्त एकच पाऊल मागे आहे. बुधवारी सायंकाळी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग होणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. त्यासाठी इस्रोचे शास्रज्ञ तयार असून विक्रम लँडरची स्थिती पाहून या यानाचे चंद्रावर लँडिंग करण्यात येणार आहे. हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरणार असल्याचा विश्वासही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे लँडिंग करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची बाजू ही अत्यंत खडतर आहे. इथे अनेक खड्डे आहेत. त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचे लँडिंग करणे इस्रोसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे इस्रोच्या शास्रज्ञांनी या यानाची रचनाच अशा प्रकारे केली आहे की या सर्व परिस्थितीत हे यान लँडिंग करण्यास सक्षम असेल. तसेच याच परिस्थितीत यानामध्ये जास्त इंधनसाठादेखील समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच हे यान मजबूत करण्यात आले आहे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत यानाला धक्का पोहोचणार नाही. भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले होते. आता काही तासांमध्ये हे यान चंद्रावर उतरणार आहे.
 
द. ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरणार
आतापर्यंत तीन देशांनी आपली चांद्रमोहिम यशस्वी केली आहे. त्यामध्ये रशिया, अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे. पण यापैकी कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले नव्हते. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे. दक्षिण ध्रुवावर भारताचे यान उतरून तेथील संशोधन करणार आहे.
 
…तर २७ ऑगस्टला लँडिग
इस्रोच्या अहमदाबाद केंद्राचे प्रमुख निलेश एम. देसाई यांनी सांगितले की, चांद्रयान-३ संदर्भात २३ ऑगस्ट रोजी लँडिंगच्या काही तास आधी लँडिंगसाठी ही वेळ योग्य आहे की नाही. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर हे लँडिंग २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
 
विद्यार्थ्यांना पाहता येणार लाईव्ह मोहीम
चांद्रयान-३ हे उद्या बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होणार आहे. या मोहिमेचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. त्यामुळे शाळांसह विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना मोहीम लाईव्ह पाहता येणार आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor