शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (15:18 IST)

Tamil Nadu : विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; नऊ ठार,6 जखमी

तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील वेंबकोट्टई येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी स्फोट झाला. या अपघातात येथे काम करणाऱ्या 9 कामगारांचा मृत्यू झाला,तर अन्य 6 कामगार गंभीर जखमी झाले. हा फटाका कारखाना मुथुसामीपुरम येथे होता, ज्याच्या मालकाचे नाव विजय असल्याचे सांगितले जाते.  स्फोटानंतर सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. 
 
कारखान्याच्या केमिकल मिक्सिंग रूममध्ये हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या स्फोटात कारखान्याजवळील चार इमारतींचेही नुकसान झाले आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की ज्या घरामध्ये फटाका बनवण्याचा कारखाना सुरू होता ते घर जमीनदोस्त झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9  जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. सहा गंभीर जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 
तामिळनाडूमध्ये फटाक्यांचा मोठा उद्योग आहे. सरकारी परवाना नसलेले अनेक बेकायदा कारखानेही येथे सुरू आहेत.सरकारी परवाना नसलेले अनेक बेकायदा कारखानेही येथे सुरू आहेत. अशा कारखान्यांमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने कामगार प्रत्येक क्षणी जीव धोक्यात घालून काम करतात. तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्हा फटाके निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखला जातो. 

 Edited by - Priya Dixit