तरुण तेजपालविरोधात आरोप निश्चिती
‘तहलका’चा माजी संपादक तरुण तेजपालविरोधात उत्तर गोव्यातील मापुसा न्यायालयाने गुरुवारी आरोप निश्चित केले. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३४१, ३४२, ३५४ अ, ३५४ ब कलमान्वये आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सहकारी तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपपत्राची प्रत तेजपालला दिली आहे. तेजपालच्या वकिलांनी न्यायालयाकडे आणखी एका महिन्याचा कालावधी मागितला होता. मात्र, न्यायालयाने तो देण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती तेजपालने उच्च न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. कनिष्ठ न्यायालयातील आरोप निश्चितीवरही स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण उच्च न्यायालयाने तेजपालची विनंती फेटाळून लावली होती. तसेच मापुसा न्यायालयाने तेजपालविरोधात आरोपनिश्चिती करावी, असे आदेश दिले होते.