भक्तांसाठी तिरुपती बालाजी मंदिराचे दरवाजे पुन्हा खुले
सरकारने अनलॉक-1 सुरु केल्यानंतर 8 जूनला तिरुमला तिरुपती देवस्थानने भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पुन्हा खुले केले. पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी देवस्थानला हुंडी संग्रहात तब्बल 25.7 लाख रुपये मिळाले आहेत.
तब्बल 83 दिवसांच्या लॉकडाउननतंर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुरुवातीचे तीन दिवस केवळ येथील कर्मचारी आणि स्थानिक लोकांसाठीच होते. आता 11 जूनपासून सर्वांसाठी या मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येणार आहेत.
यापूर्वी तिरुमाला तिरुपती देवस्थान खुले करण्यापूर्वी काउंटर्सवर तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या होत्या. राज्याने सकाळी 8 वाजता राज्यातील सर्वच काउंटर्सवर तिकीट विक्री सुरू केली होती. 11 तारखेची तिकिटे अवघ्या काही वेळातच विकली गेली होते. यानंतर आंध्र प्रदेश सरकारने 12 तारखेची तिकिटे विकण्याचा निर्णयही घेतला होता.
दर्शनासाठी येतांना भाविकांना मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच रांगेत उभे राहण्यापूर्वी सॅनिटाइझ होणेही बंधनकारक असेल. देवस्थानने मंदिर परिसराचे स्पर्श-मुक्त परिसरात रुपांतर केले आहे. भाविक रांगेत आल्यानंतर, कोणत्याही गोष्टींसाठी त्यांना कुठेही स्पर्श करावा लागणार नाही. तसेच भक्तांना रांगेत 5 ते 6 फुटांचे अंतर ठेवावे लागेल.